Join us
Daily Top 2Weekly Top 5

अब्जाधीशांच्या यादीत अदानी काही क्षणांसाठी दुसऱ्या स्थानी; अरनॉल्ट मागे राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 10:17 IST

१७ दिवसामध्येच अदानींनी तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

नवी दिल्ली - भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हे १५४.७ अब्ज डॉलरच्या(सुमारे १२.३४ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिक बनले. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीश यादीनुसार, अदानी यांनी फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. मात्र या स्थानावर ते काही कालावधीसाठीच होते. अरनॉल्ट हे पुन्हा दुसऱ्या स्थानावर परतले. 

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत आशियाई उद्योगपती प्रथमच टॉप २ स्थानी पोहोचला. अदानी उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदानी यांच्या पुढे केवळ टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क होते. पहिल्या क्रमांकावर असलेल्या मस्क यांची संपत्ती २१.८३ लाख कोटी रुपये(२७३.५ अब्ज डॉलर) आहे. बर्नार्ड अरनॉल्ट हे १२.२७ लाख कोटी रुपयांच्या (१५३.८ अब्ज डॉलर) संपत्तीसह तिसऱ्या, तर अॅमेझोनचे प्रमुख जेफ बेझोस हे ११.९५ लाख कोटी रुपयांच्या(१४९.७ अब्ज डॉलर) संपत्तीसह चौथ्या स्थानी आले होते. मात्र अरनॉल्ट यांची संपत्ती वाढून १५४.८ अब्ज डॉलर्स एवढी झाली. तर अदानी यांची संपत्ती घटून १५१.३ अब्ज डॉलर्स एवढी झाली. 

त्यामुळे अदानी तिसऱ्या स्थानी घसरले. तर बेझोस हे चौथ्या स्थानी आले आहेत. फोर्ब्सच्या टॉप १० अब्जाधीश उद्योगपतींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ८ व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ७.३५ लाख कोटी रुपये(९२.१ अब्ज डॉलर) आहे. अदानी यांनी यंदा फेब्रुवारीमध्ये रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकले होते. अदानी समुहात ७ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. एप्रिल २०२१ मध्ये त्यांची संपत्ती ५७ अब्ज डॉलर होती. वर्षभरात संपत्तीत ७८ अब्ज डॉलर्सची भर१७ दिवसामध्येच अदानींनी तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. २०२२ मध्ये अदानींची संपत्ती एकूण ७८.२ अब्ज डॉलर्सने वाढली. अन्य कोणत्याही व्यावसायिकाच्या तुलनेत ही संपत्ती ५ पट अधिक आहे. 

टॅग्स :अदानी