नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफची घोषणा केली असली, तरी त्याचा भारताच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही, असे अमेरिकेचीच रेटिंग एजन्सी 'एस अँड पी'ने जवळपास १८ वर्षांनंतर गुरुवारी भारताचे सार्वभौम पतमानांकन वाढवून 'बीबीबी' केले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत असून, दीर्घ कालावधीचा विचार करता अमेरिकेच्या टॅरिफचा मोठा परिणाम होणार नाही, असे सांगत, एस अँड पी ग्लोबलने भारताचे शॉर्ट-टर्म रेटिंग A-3 वरून A-2 केले आहे आणि ट्रान्सफर आणि कन्व्हर्टिबिलिटी असेसमेंट बीबीबीवरून A- पर्यंत सुधारित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, भारताने पायाभूत सुविधा उभारणीसह सर्वसमावेशक दृष्टिकोनाला प्राधान्य दिल्याने रेटिंग अपग्रेड झाले आहे. 'विकसित भारत २०४७'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत विकासाची गती कायम ठेवेल.
२०३० पर्यंत भारत होणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
एस अँड पीने भारतीय अर्थव्यवस्थेचा २०२५चा विकास दर ६.३ टक्केवरून ६.५ टक्के केला आहे. तसेच २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल, असे म्हटले. तसेच, 'लुक फॉरवर्ड इंडिया मोमेंट' रिपोर्टमध्ये २०३१ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ३.४ लाख कोटी डॉलरवरून ६.७ लाख कोटी डॉलर होईल, दरडोई उत्पन्न ४,५०० डॉलर्सवर जाईल, असेही म्हटले आहे.
टॅरिफचा परिणाम का होणार नाही?
भारताची अमेरिकेला निर्यात एकूण जीडीपीच्या केवळ २ टक्के आहे. यामुळे टॅरिफचा परिणाम होणार नाही.
औषधनिर्मिती, कन्ड्युमर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या भारताच्या मुख्य निर्यात वस्तूंना टॅरिफमधून वगळले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे सामर्थ्य देशांतर्गत बाजारपेठेत आणि वेगाने वाढत असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये असून, ती निर्यातीवर अवलंबून नाही.
भारतच आशिया-प्रशांतचे विकास इंजिन
'चायना स्लोज इंडिया ग्रोथ' या एस अँड पीच्या अहवालानुसार, चीनऐवजी भारत आशिया-प्रशांत क्षेत्राचे विकास इंजिन होईल. २०२६ पर्यंत भारताचा जीडीपी वृद्धी दर ७ टक्के, तर चीनचा दर ४.६ टक्के राहील.