अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ड्रेट अॅडव्हायझर पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताबद्दल गरळ ओकली आहे. नवारो यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर रशियाकडूनभारताच्या उर्जा व्यापाराला लक्ष्य केलं आणि अनेक आरोपही केले.
नवारो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करीत आहे आणि "रक्ताच्या पैशांची देवाण-घेवाण करत आहे," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सनं त्यांच्या दोन्ही पोस्टवर फॅक्ट चेक करत नवारो यांचे दावे दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं.
भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
सातत्यानं होणाऱ्या फॅक्ट-चेकवर संतापलेल्या नवारो यांनी इलॉन मस्क यांच्यावरही हल्लाबोल केला. तसंच मस्क हे भारत सरकारच्या प्रचाराला पुढे नेत आहेत आणि सत्य दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. "भारत केवळ नफ्यासाठी रशियन कच्चं तेल खरेदी करीत आहे. हे युद्ध भारतामुळे दीर्घकाळ सुरू आहे," अशी गरळदेखील त्यांनी ओकली.
एक्सनं यापूर्वी काय म्हटलेलं?
"भारत हा रशियाकडून नफा कमावण्यासाठी नाही, तर त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत आहे. हे निर्बंधांचं उल्लंघन नाही. भारतावर काही टॅरिफ नक्कीच लावण्यात आलंय. परंतु अमेरिकेचे रशियासोबतच सेवांचे व्यापार सरप्लस आहेत. अमेरिकेनं रशियाकडून काही वस्तूंची आयातही कायम ठेवली आहे आणि ही दुतोंडी भूमिका आहे," असं एक्सनं म्हटलं होतं.
मस्क यांच्यावर निशाणा
फॅक्ट चेकनंतर संताप व्यक्त करत नवारो यांनी इलॉन मस्क यांनाही लक्ष्य केलं. मस्क लोकांच्या पोस्टमध्ये चुकीच्या माहितीला स्थान देत आहेत. खाली दिलेली नोट तंतोतंत सारखीच आहे. भारत केवळ नफा कमावण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करतो. रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी त्यानं कोणतंही तेल खरेदी केलं नाही. भारत सरकारचं स्पिन मशीन वेगानं धावत आहे. युक्रेनियन लोकांना मारणं थांबवा. अमेरिकन नोकऱ्या काढून घेणे थांबवा," असं त्यांनी यावर नमूद केलं.
भारतानं काय म्हटलं?
"आम्ही त्याची काही चुकीची वक्तव्य ऐकली आहेत. आम्ही ती फेटाळून लावतो. एक्सवरच्या फॅक्ट चेक नोट्समध्येही भारतानं रशियाकडून कच्चं तेल विकत घेणं हे कायद्याच्या अंतर्गत असल्याचं म्हटलंय. हे नफ्यासाठी नाही तर केवळ ऊर्जेच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेलं पाऊल आहे," अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रायचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी दिली.