लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या समतुल्य आयात शुल्काला उत्तर म्हणून भारतानेही अमेरिकेच्या आयात वस्तूंवर प्रतिशुल्क (रिटॅलिएटरी टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक व्यापार संघटनेला (डब्ल्यूटीओ) याबाबतची माहिती भारताने दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेने भारताचे पोलाद व अॅल्युमिनियम यांच्यावर लावलेल्या आयात शुल्काला उत्तर म्हणून भारताने कारवाई केली आहे.
कोणत्या तरतुदीचा भारताने घेतला फायदा?
सूत्रांनी सांगितले की, डब्ल्यूटीओ कराराच्या अनुच्छेद १२.५ अन्वये ही नोटीस भारताने दिली आहे. या अनुच्छेदानुसार कोणत्याही देशास प्रत्युत्तरादाखल उपाययोजना करण्याचा अधिकार आहे. विशेष म्हणजे, आयात शुल्क लावताना अमेरिकेने अनुच्छेद १२.३ अन्वये भारतासोबत आवश्यक बोलणीही केलेली नाहीत.