भारत अन्न सुरक्षेच्या चिंतेपासून पूर्णपणे मुक्त आहे. देशातील सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १४% पेक्षा जास्त वाढला आहे, जो सप्टेंबरच्या सुरुवातीला विक्रमी पातळीवर पोहोचलाय. दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार, शेतकऱ्यांकडून वाढत्या खरेदीमुळे गव्हाचा साठाही चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलाय. विक्रमी तांदळाचा साठा भारताला अधिक निर्यात करण्यास मदत करेल. सुधारित गव्हाचा साठा खुल्या बाजारातील विक्रीद्वारे सरकारला किमतीतील वाढ नियंत्रित करण्यास देखील मदत करेल.
सरकारी आकडेवारीनुसार, १ सप्टेंबरपर्यंत तांदळाचा साठा ४८.२ दशलक्ष टन होता, ज्यामध्ये न दळलेल्या धान्याचाही समावेश आहे. हे १ जुलै रोजी सरकारनं ठरवलेल्या १३.५ दशलक्ष टनांच्या उद्दिष्टापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. १ सप्टेंबरपर्यंत गव्हाचा साठा ३३.३ दशलक्ष टन होता, जो सरकारच्या २७.६ दशलक्ष टनांच्या उद्दिष्टापेक्षाही जास्त आहे.
भारत विक्रमी निर्यातीसाठी सज्ज
तांदळाची निर्यात वाढत आहे. भारत या वर्षी विक्रमी प्रमाणात निर्यात करण्यास सज्ज असल्याचं एका जागतिक व्यापारी कंपनीच्या नवी दिल्ली येथील डीलरनं सांगितलं. दरम्यान, गेल्या वर्षीच्या विक्रमी कापणीमुळे तांदळाचा साठा अधिक झालाय. रॉयटर्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
जागतिक तांदळाच्या निर्यातीत भारताचा वाटा सुमारे ४०% आहे. धान्यावरील शेवटची निर्यात बंदी मार्च २०२५ मध्ये उठवण्यात आली होती. तांदूळ निर्यातदार संघटनेचा अंदाज आहे की भारतातून या वर्षी सुमारे २५% वाढ होऊन ती २२.५ दशलक्ष टन होईल.
नवीन पीक पुढील महिन्यात
नवीन पिक पुढील महिन्यात येण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे सरकारी संस्थांसाठी साठवणुकीच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं एका व्यापाऱ्यानं सांगितलं.
तर दुसरीकडे, गेल्या तीन वर्षांपासून कमी गव्हाचा साठा सरकारसाठी चिंतेचा विषय होता. परंतु, आता पुरेसा पुरवठा उपलब्ध असल्यानं, सणांच्या काळात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार खुल्या बाजारात धान्य आणू शकते. ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळीचा सण येतो, जेव्हा गव्हाची मागणी सहसा वाढते, असं मुंबईतील एका व्यापाऱ्यानं सांगितलं.