Join us

रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 08:49 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य लोक रिझर्व्ह बँक व्याजदरात कधी कपात करणार याकडे लक्ष ठेवून आहेत. पण दीर्घकाळापासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केलेली नाही. पाहूया याबाबत काय म्हटलंय मूडीजनं.

गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य लोक रिझर्व्ह बँक व्याजदरात कधी कपात करणार याकडे लक्ष ठेवून आहेत. पण दीर्घकाळापासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केलेली नाही. दरम्यान, दुसरीकडे Moody's Ratings नं भारताची अर्थव्यवस्था सध्या चांगल्या स्थितीत असल्याचं म्हणत २०२४ मध्ये जीडीपी ७.२ टक्क्यांच्या दरानं वाढणार असल्याचं म्हटलंय. महागाईचा धोका कायम असल्यानं रिझर्व्ह बँक यावर्षीही व्याजदरात कपात करणार नाही असं मूडीजनं म्हटलंय.

भाजीपाल्याच्या दरात झपाट्यानं वाढ झाल्यानं किरकोळ महागाई १४ महिन्यांतील उच्चांकी ६.२१ टक्क्यांवर पोहोचली आहे. असं असलं तरी येत्या काही दिवसांत ती रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाच्या जवळ येण्याची शक्यता आहे. एजन्सीनं पिकांची जास्त पेरणी आणि अन्नधान्याचा पुरेसा बफर स्टॉक हे यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलंय.

दिलासा मिळणार का?

वाढता भूराजकीय तणाव आणि हवामानातील बदलांमुळे महागाईचा धोका टळलेला नाही, त्यामुळे रिझर्व्ह बँक आपल्या धोरणांबाबत सावध राहील आणि व्याजदरात दिलासा मिळेल अशी फारशी आशा नाही, असं मूडीजनं म्हटलंय. रिझर्व्ह बँकेनं ऑक्टोबरमध्ये रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला होता. मूडीजच्या मते पुढील वर्षीही ही परिस्थिती कायम राहू शकते.

पुढील महिन्यात बैठक

व्याजदर ठरवणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची पुढील महिन्यात बैठक होणार असून महागाई उच्चांकी पातळीवर असल्यानं रिझर्व्ह बँक बेंचमार्क व्याजदरात कपात करण्याची शक्यता नाही. मूडीजनं आपल्या ग्लोबल मॅक्रो आउटलूक २०२५-२६ मध्ये, सणासुदीच्या काळात खर्च वाढल्यानं आणि ग्रामीण भागातील मागणी वाढल्यानं येत्या काही दिवसांत घरगुती वापर वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलंय.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसा