नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियन तेल खरेदीवरून धमकी आणि युरोपियन युनियनच्या निर्बंधांमुळे भारताला रशियन तेल खरेदी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पाश्चात्य जहाज कंपन्यांनी नायरासाठी कच्चे तेल वाहून नेण्यास नकार दिल्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात नायरा एनर्जीला तेलाचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
केपलरचे सुमित रिटोलिया यांनी सांगितले, नायराची परिस्थिती कठीण झाली आहे. नियम, शिपिंग, पेमेंट चॅनल्स आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरून मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.
नेमके काय झालेय?
जुलैमध्ये युरोपियन युनियनने २०२६ पासून रशियन कच्च्या तेलापासून
तयार होणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली.
याशिवाय, रशियन व आंतरराष्ट्रीय जहाज व्यवस्थापन कंपन्या, रशियन तेल व्यापारी आणि वाडिनार रिफायनरी (ज्यात रोसनेफ्टची ४९.१३ टक्के हिस्सेदारी आहे) यांनाही थेट निशाण्यावर घेतले.
या निर्बंधांमुळे पाश्चात्त्य जहाज कंपन्यांनी नायराचे तेल वाहून नेण्यास नकार दिला, तसेच पश्चिमेकडील विमा कंपन्यांनी या तेलासाठी संरक्षण देण्यासही हात आखडता घेतला. त्याचा फटका भारताला बसत आहे.