Trump Tariffs Impact: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के शुल्क आणि रशियाकडून लष्करी उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्यास दंड आकारण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर, गुरुवारी भारतीय कोळंबी खाद्य निर्यातदार अवंती फीड्स लिमिटेड, वॉटरबेस लिमिटेड आणि अॅपेक्स फ्रोझन फूड्स लिमिटेड यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आज, गुरुवार, ३१ जुलै रोजी कंपनीचे शेअर्स ६% नं घसरले.
अधिक माहिती काय?
या कंपन्यांसाठी अमेरिका ही कोळंबी निर्यातीची एक प्रमुख बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी मार्च तिमाहीत, अवंती फीड्सनं उत्तर अमेरिकन बाजारपेठेतून एकूण उत्पन्नापैकी ७७% उत्पन्न मिळवलं, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ८०% होतं. अॅपेक्स फ्रोझन फूड्सनं मार्च तिमाहीच्या रिपोर्टमध्ये, त्यांच्या एकूण महसुलापैकी ५३% उत्पन्न अमेरिकेतून आल्याची माहिती दिली.
जागतिक कोळंबी बाजारपेठेत भारताचा सध्या सुमारे २०% वाटा आहे आणि या आर्थिक वर्षात उत्पादन १.२ दशलक्ष मेट्रिक टनांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अवंती फीड्सच्या वार्षिक अहवालानुसार, भारतीय कोळंबी निर्यातीपैकी सुमारे ४८% निर्यात अमेरिकन बाजारपेठेसाठी केली जाते. त्यामुळे या ट्रम्प यांच्या या निर्णयाचा कंपनीवर परिणाम होऊ शकतो. सध्या, अमेरिकेला होणाऱ्या भारतीय कोळंबीच्या निर्यातीवर १७.७% प्रभावी सीमाशुल्क आकारले जाते, ज्यामध्ये ५.७% काउंटरवेलिंग ड्युटी आणि १.८% अँटी-डंपिंग ड्युटी समाविष्ट आहे. आता ते २५% पर्यंत वाढेल.
शेअर्सची स्थिती
गेल्या एका महिन्यात अवंती फीड्सच्या शेअर्समध्ये ६% घट झाली आहे, तर वॉटरबेसच्या शेअर्समध्ये ३.३% ची घसरण झालीये, तर अॅपेक्स फ्रोझन फूड्सच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)