India EU Trade Deal: भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या युरोपियन युनियनसोबत (EU) मुक्त व्यापार कराराची (FTA) घोषणा मंगळवारी भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेत केली जाईल. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी युरोपियन युनियनचे सर्वोच्च नेते सध्या दिल्लीत आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी यासंदर्भातील माहिती दिली. दोन्ही पक्ष एकमेकांसाठी फायदेशीर ठरेल असा मुक्त व्यापार करार करण्यासाठी कटिबद्ध आहेत. यामुळे दोन्ही बाजूंचे व्यवसाय आणि लोकांची प्रगती होईल, असं ते म्हणाले. सूत्रांच्या माहितीनुसार, कृषी, दुग्धव्यवसाय आणि पर्यावरणाशी संबंधित काही मुद्दे या करारातून सध्या वेगळे ठेवण्यात आले आहेत.
प्रजासत्ताक दिन सोहळा आणि भारत-EU समिटसाठी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा रविवारी नवी दिल्लीत पोहोचले. कौन्सिलनं म्हटलंय की, मंगळवारी होणारी १६ वी भारत-EU समिट ही धोरणात्मक भागीदारी आणि महत्त्वाच्या धोरण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्याची मोठी संधी असेल. युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन या २४ जानेवारीलाच भारतात दाखल झाल्या होत्या.
मदर ऑफ ऑल डील्स
पीयूष गोयल यांनी EU चे व्यापार आयुक्त मारो सेफचोविच यांच्या सोशल मीडिया पोस्टला उत्तर देताना म्हटलं की, "गेल्या वर्षभरापासून आमच्या टीम्समध्ये सुरू असलेल्या रचनात्मक संवादामुळे आपण एका अर्थपूर्ण परिणामाच्या जवळ पोहोचलो आहोत, याचा आनंद आहे." सेफचोविच यांनी देखील विश्वास व्यक्त केला की, ते FTA वरील चर्चेच्या पूर्णत्वाच्या अगदी जवळ आहेत.
करारातील महत्त्वाचे पैलू
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या करारात भारत आपल्या कृषी क्षेत्रात EU ला कोणतीही सवलत देणार नाही. त्याचप्रमाणे, EU चा कार्बन टॅक्स आणि जंगलतोड कायद्याशी (Deforestation Act) संबंधित मुद्देही पूर्णपणे सुटलेले नाहीत. तरीही, एकंदरीत पाहता भारतासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरणार आहे. यापूर्वी पीयूष गोयल यांनी या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' असं संबोधलं होतं.
Web Summary : India and the European Union are set to announce a major free trade agreement. Dubbed the 'Mother of All Deals,' it promises significant economic benefits. While agriculture and environmental concerns remain, this is India's largest trade agreement to date.
Web Summary : भारत और यूरोपीय संघ एक बड़े मुक्त व्यापार समझौते की घोषणा करने वाले हैं। 'मदर ऑफ ऑल डील्स' के रूप में चर्चित, इससे महत्वपूर्ण आर्थिक लाभ मिलने की उम्मीद है। कृषि और पर्यावरण संबंधी चिंताएं बरकरार हैं, फिर भी यह भारत का अब तक का सबसे बड़ा व्यापार समझौता है।