पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या अडचणी वाढत आहेत. सर्वप्रथम भारताने कारवाई करत सिंधू जलकरार स्थगित केला आणि अटारी सीमा बंद करण्याबरोबरच अनेक मोठे निर्णय घेतले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली. आता भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानला अनेक अर्थांनी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. चला समजून घेऊया का आणि कसा?
२३ मे पर्यंत भारताची हवाई हद्द बंद
पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घातल्यानंतर भारतानेही पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद केलं आहे. नोटीस टू एअरमननुसार, भारतानं ३० एप्रिल ते २३ मे २०२५ या काळात देशाच्या हवाई क्षेत्रात पाकिस्तानी प्रवासी विमान, लष्करी विमानांना बंदी आणली आहे. नोटीस टू एअर मिशन सिस्टम अशी व्यवस्था आहे ज्याच्या मदतीनं फ्लाईटमध्ये असणाऱ्या केबिन क्रूला महत्वाच्या सूचना पाठवल्या जातात. विमानातील पायलटला हवामान, विस्फोट, हवाई क्षेत्रात बंदी, पॅराशूट जंप, रॉकेट लॉन्च आणि सैन्य सराव सारखी संवेदनशील माहिती या नोटीस टू एअरमनमार्फत पाठवली जाते.
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
आर्थिक फटका बसणार
भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानला लागणाऱ्या आर्थिक फटक्याबद्दल बोलायच झाल्यास, पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना भारताच्या हवाई क्षेत्राच्या बंद झाल्यामुळे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी लांबच्या मार्गानं जावं लागेल. त्यामुळे उड्डाणांची अंतर आणि वेळ दोन्ही वाढेल आणि विमानांमध्ये इंधनाचा वापर वाढेल. या अडचणीमुळे परिचालनाच्या खर्चात वाढ झाल्यास विमान कंपन्या प्रवाशांवर अधिक बोजा टाकू शकतात आणि हवाई प्रवास महागडा होऊ शकतो. असं झाल्यास, हवाई यात्रा करण्यास जास्त वेळ व अधिक भाडं लागल्यामुळे लोकांना प्रवास करण्यास संकोच वाटण्याची शक्यता आहे आणि हे पाकिस्तानच्या विमान कंपन्यांच्या महसुलावर परिणाम करेल.
उदाहरण म्हणून समजून घ्यायचं झालं तर, आतापर्यंत पाकिस्तानच्या इस्लामाबादहून क्वालालंपूर विमानाला (Islamabad To Kuala Lumpur Flight) आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे ५ तास ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. पण भारतीय हवाई क्षेत्र बंद झाल्याने आता या उड्डाणाला हे अंतर पार करण्यास सुमारे ८ तास आणि ३० मिनिटांचा वेळ लागेल.