Join us

Independence Co-operative Bank: महाराष्ट्रातील आणखी एक सहकारी बँक बुडाली; RBI चे आदेश, ९९ टक्के ग्राहकांना मिळणार ५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 16:27 IST

RBI cancel license of bank in Maharashtra: आरबीआयच्या आदेशानुसार, बँकेच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत केल्या जातील. या सहकारी बँकेची आर्थिक स्थिती पाहता गेल्या वर्षी देखील आरबीआयने यावर निर्बंध टाकले होते.

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव बँक लिमिटेड (Independence Co-operative Bank Ltd) चे लायसन रद्द केले आहे. यामुळे ही बँक आजपासून ग्राहकांना सेवा देऊ शकणार नाहीय. आरबीआयने गुरुवारी याबाबत नोटीफिकेशन काढले असून ही बँक ३ फेब्रुवारी २०२२ पासून बँकिंग व्यवहार करणे बंद करणार आहे असे म्हटले आहे. 

या सहकारी बँकेची आर्थिक स्थिती पाहता गेल्या वर्षी देखील आरबीआयने यावर निर्बंध टाकले होते. तेव्हाच्या निर्णयानुसार ग्राहक ६ महिने पैसे काढू शकत नव्हते. मात्र, बँकेच्या कारभारात काहीच सुधारणा झाली नाही यामुळे आता लायसन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. बँकेकडे पुरेसा पैसा नाहीय, यामुळे भविष्यात उत्पन्नाची कोणतीही आशा नाहीय. यामुळे या बँकेचे लायसन रद्द करणेच ग्राहकांच्या हिताचे असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 

ही सहकारी बँक नाशिकची आहे. या आदेशाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कल्पना देण्यात आली आहे. याचबरोबर आरबीआयने ग्राहकांचे पैसे परत करण्यासंबंधी देखील सूचना केल्या आहेत.

आरबीआयच्या आदेशानुसार, बँकेच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत केल्या जातील. बँकेच्या आकडेवारीनुसार,  99% खातेधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम मिळणार आहे. या ग्राहकांच्या बँक खात्यात 5 लाख किंवा त्याहून कमी रक्कम जमा आहे. बँकेचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका फक्त 1 टक्के ग्राहकांना बसणार आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहाराष्ट्र