Join us
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांसाठी आयकर विभागाची आॅनलाइन चॅट सुविधा, करदात्यांच्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देणार; वेबसाइटवर विशेष विंडोची सोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:33 IST

करदात्यांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयकर विभागाने ‘आॅनलाइन चॅट’ सुविधा सुरू केली आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटच्या मुख्य पानावर त्यासाठी एक विंडो देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : करदात्यांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयकर विभागाने ‘आॅनलाइन चॅट’ सुविधा सुरू केली आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटच्या मुख्य पानावर त्यासाठी एक विंडो देण्यात आली आहे. ‘लाइव्ह चॅट आॅनलाइन-आस्क यूअर क्युरी’ असा मजकूर असलेला ठळक आयकॉन ही विंडो दर्शविते.आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, विभागातील तज्ज्ञांचे एक पथक तसेच काही स्वतंत्र कर व्यावसायिक या विंडोवरून करदात्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. करदात्यांच्या सेवेत वाढ करण्यासाठी हा विशेष पुढाकार विभागाने घेतला आहे. प्रतिसादानुसार या चॅटव्यवस्थेत आणखी काही फिचर्स जोडण्याचा विभागाचा मानस आहे.आपला ई-मेल आयडी नोंदवून कोणीही व्यक्ती चॅट रूममध्ये प्रवेश करू शकेल, तसेच अतिथी म्हणून प्रश्न विचारू शकेल. चॅटसेवेवरील संवादाचा भविष्यात संदर्भ म्हणून उपयोग करता यावा यासाठी हा संपूर्ण संवाद आपल्या ई-मेल आयडीवर मेल करता येतो. आॅनलाइन चॅटसेवेवर मिळणारी उत्तरे आयकर विभागाचे अधिकृत स्पष्टीकरण म्हणून मात्र गृहीत धरता येणार नाहीत. यासंबंधीची पूर्वसूचना म्हणते की, ‘येथे दिली जाणारी उत्तरे तज्ज्ञांची स्वत:ची मते आहेत. कोणत्याही प्रकरणातील आयकर विभागाचे स्पष्टीकरण, असा त्यांचा अर्थ काढण्यात येऊ नये.’अलीकडे आयकर विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्यावर्षी आयकर विभागाने करदात्यांच्या तक्रारींचे नियमन आणि निवारण करण्यासाठी स्वतंत्र संचालनालय सुरू केले होते. त्याही पुढे जाऊन आता मार्गदर्शनाची आॅनलाइन सोय विभागाने सुरू केली आहे. 

टॅग्स :इन्कम टॅक्सऑनलाइनभारत