Join us  

निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 8:04 AM

LPG Gas Cylinders Price Cut: देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात केली आहे.

देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात केली आहे. मात्र ही कपात १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये करण्यात आली आहे. देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीपासून मुंबईपर्यंत गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये १९ ते २० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आयओसीएलच्या वेबसाईटनुसार सिलेंडरच्या नव्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. त्या १ मे २०२४ पासून लागू झाल्या आहेत.

इंडियन ऑईलने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १ मे पासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १७१७.५० रुपयांवरून घटून १६९८.५० रुपये एवढी झाली आहे. तर दिल्लीमध्ये ही किंमत १७६४.५० रुपयांवरून घटून १७४५.५० रुपये एवढी झाली आहे. चेन्नईमध्येही व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९३० रुपयांवरून घटून १९११ रुपये एवढी झाली आहे.

मात्र दैनंदिन घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठलीही घट झालेली नाही. या गॅस सिलेंडरची किंमत ८०३ रुपये एवढी स्थिर आहे. मुंबईत घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत ८०२.५० रुपये एवढी आहे. तर उज्ज्वला गॅस योजनेमधील लाभार्थ्यांना हा सिलेंडर ६०३ रुपयांना मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये होत असतो. त्यामुळे याच्या किमतीमध्ये घट झाल्याने त्याचा सर्वसामान्यांना थेट फायदा होत नाही. तर केवळ हॉटेल रेस्टॉरंटमधील खाण्याच्या किमती कदाचित घटू शकतात.  

टॅग्स :गॅस सिलेंडरपैसाभारत