Join us

उन्हाळ्यात वाहन विक्रीचा ‘तडका’; १० टक्के वाढ, खेड्यांमध्ये जोरदार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 10:01 IST

उन्हाळ्यात एसी आणि कुलरची विक्री एकीकडे ‘थंड’ राहिली तरी वाहनविक्रीचे वातावरण तापलेलेच आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : उन्हाळ्यात एसी आणि कुलरची विक्री एकीकडे ‘थंड’ राहिली तरी वाहनविक्रीचे वातावरण तापलेलेच आहे. मे महिन्यातही लाेकांनी माेठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी केली. या महिन्यात २० लाखांपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बहुतांश श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

वाहन विक्रेत्यांचा महासंघ ‘फाडा’ने वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. मे महिन्यात एकूण २० लाख १९ हजार वाहनांची विक्री झाली. त्यात प्रवासी वाहनांची संख्या २.९८ लाख एवढी हाेती. यामध्ये चार टक्के वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत एप्रिल महिन्यात काही प्रमाणात घट झाली हाेती. मात्र, यावेळी वाढ झाली आहे. याशिवाय दुचाकी वाहनांची विक्रीही नऊ टक्क्यांनी वाढली आहे.

ट्रॅक्टरची विक्रीही दहा टक्क्यांनी वाढून ७० हजारांवर गेली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हा आकडा ६४ हजार ५२८ एवढा हाेता. चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेमुळे ट्रॅक्टर खरेदी वाढल्याचे फाडाचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात मागणी 

अलीकडच्या काळात वाहन कंपन्यांनी नवे माॅडेल्स लाॅंच केले आहे. गाड्यांची उपलब्धता वाढली आहे. मागणी वाढली आहे. लग्न हंगाम, फेम अनुदान याेजनेतील बदलांचा दुचाकींच्या मागणीवर सकारात्मक परिणाम झाला. ग्रामीण भागात मागणी वाढली आहे. परिणाम दुचाकी विक्रीवर झाला आहे. मनीष राज सिंघानिया, अध्यक्ष फाडा

एकूण वाहन विक्री

मे २०२३    २०,१९,४१४मे २०२२     १८,३३,४२१

प्रवासी वाहनांची विक्री

मे २०२३     २,९८,८७३मे २०२२     २,८६,५२३

दुचाकींची विक्री

मे २०२३     १४,९३,२४३मे २०२२     १३,६५,९२४

 

टॅग्स :वाहन