Artificial Intelligence : सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स धुमाकूळ घालत आहे. एआयच्या आगमनानंतर विविध उद्योगांमध्ये वेगाने बदल घडताना पाहायला मिळत आहे. या बदलाचा परिणाम थेट नोकऱ्यांवर होत आहे. 'इग्नाइटटेक' या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक अत्यंत कठोर आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. एआय स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आपल्या सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरून काढून टाकले. यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
'एआय मंडे' आणि कर्मचाऱ्यांचा विरोधइग्नाइटटेकचे सीईओ एरिक वॉन यांना भविष्यात एआयमुळे त्यांच्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव झाली. म्हणून त्यांनी २०२३ मध्ये 'एआय मंडे' नावाचा एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमानुसार, आठवड्यातील एक दिवस कर्मचाऱ्यांना एआय-संबंधित प्रकल्पांवर काम करणे अनिवार्य होते. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी, विशेषतः तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला.
कर्मचाऱ्यांनी एआयच्या मर्यादांवर चर्चा सुरू केली, तर मार्केटिंग आणि सेल्स टीमने मात्र कोणताही विरोध न करता नवीन प्रशिक्षण कार्यक्रम स्वीकारला. वॉन यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांच्या पगाराच्या २० टक्के रक्कम खर्च केली, ज्यात एआय टूल्स आणि 'प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग क्लासेस'चा समावेश होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होण्याऐवजी निषेध व्यक्त केला.
कठोर निर्णय, पण प्रभावी परिणामकर्मचाऱ्यांचा विरोध पाहता, एरिक वॉन यांनी थेट सांगितले की, "सोमवारी एआयशी संबंधित काम करा किंवा नोकरी सोडा." या कठोर निर्णयानंतर, सुमारे ८०% कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली किंवा त्यांना काढण्यात आले. या निर्णयामुळे वाद निर्माण झाला असला, तरी २०२४ पर्यंत कंपनीला त्यांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. इग्नाइटटेकने दोन नवीन एआय सोल्यूशन्स बाजारात आणले, ज्यांची पेटंट प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, कंपनीने एक नवीन कंपनी देखील विकत घेतली, ज्यामुळे त्यांना सुमारे ७५ टक्के अतिरिक्त उत्पन्न मिळाले. यावरून हे स्पष्ट होते की वॉनने घेतलेले कठोर पाऊल कंपनीसाठी फायदेशीर ठरले आहे.
भारतात एआयचा नोकऱ्यांवर परिणामभारतातही एआयचा नोकऱ्यांवर परिणाम दिसून येत आहे. भारतीय नोकरी बाजारपेठेतील सुमारे २५% नोकऱ्या एआयमुळे प्रभावित होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अनेक मोठे आयटी आणि सेवा उद्योग त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एआयचा वापर करत आहेत, ज्यामुळे काही विशिष्ट कामांसाठी मनुष्यबळाची गरज कमी होत आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील डेटा एंट्री, बेसिक कोडिंग, आणि कस्टमर सपोर्ट यांसारख्या नोकऱ्यांवर एआयचा सर्वात जास्त परिणाम होत आहे. मात्र, याच वेळी एआय तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, आणि मशीन लर्निंग इंजिनिअर्स यांसारख्या नवीन नोकऱ्याही निर्माण होत आहेत.
वाचा - आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
WRITER या एआय प्लॅटफॉर्मच्या एका संशोधनानुसार, जगभरात अनेक कंपन्यांमध्ये एक-तृतीयांश कर्मचारी एआय स्वीकारण्यास टाळाटाळ करत आहेत. वॉन इतर नेत्यांना असेच पाऊल उचलण्याचा सल्ला देत नाहीत, कारण त्यांचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे घेण्यात आला होता. मात्र, भविष्यात कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास एआय स्वीकारणे अनिवार्य ठरू शकते.