भारतीय बाजारात स्वदेशी कंपन्यांनी चांगलाच जम बसविला आहे. ऑटो सेक्टर असेल की इलेक्ट्रॉनिक सर्वच क्षेत्रातील कंपन्या गेल्या 10 वर्षांत चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. बजाज फायनान्सने देशातील सर्वात मोठी बँक म्हणून नावाजलेल्या एसबीआयला मागे टाकले आहे. बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्समध्ये बजाज फायनान्सने पाचवा क्रमांक पटकावला आहे. कंपनीचे भागभांडवल मंगळवारी 2.32 लाख कोटींवर पोहोचले होते. तर एसबीआयचे 2.28 लाख कोटी आहे.
शेअर बाजार बुधवारी गांधी जयंतीमुळे बंद होता. गेल्या वर्षी IL & FS बुडाल्याने अनेक NBFC कंपन्यांना निधी जमविण्यासाठी झगडावे लागले. तर काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, बजाज फायनान्सवर त्याचा काही परिणाम झाला नाही.
बजाज ग्रुपची वित्त सहाय्य करणारी ही कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरधारकांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे शेअर 13.40 पटींनी म्हणजेच 1341 टक्के वाढले आहेत. याच काळात एसबीआयच्या शेअरमध्ये 5.62 टक्क्यांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार बजाज फायनान्समध्ये गुंतवणूकदार रुची दाखवत आहेत. कारण गुणवत्ता आणि फायदा अन्य कंपन्यांपेक्षा जास्त आहे.