Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जर कामात आनंद मिळत नसेल तर वॉलेटरी एक्झिट प्लॅन निवडू शकता," का म्हटलं Google नं कर्मचाऱ्यांना असं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 08:19 IST

Google News: टेक दिग्गज गूगलने आपल्या ग्लोबल बिझनेस ऑर्गनायझेशन मधील कर्मचाऱ्यांसाठी आणखी एका 'वॉलंटरी एक्झिट पॅकेज'ची घोषणा केली आहे. पाहा नक्की काय म्हटलंय गूगलनं.

Google News: टेक दिग्गज गूगलने आपल्या ग्लोबल बिझनेस ऑर्गनायझेशन (GBO) मधील कर्मचाऱ्यांसाठी आणखी एका 'वॉलंटरी एक्झिट पॅकेज'ची (VEP) घोषणा केली आहे. कंपनीच्या 'AI-फर्स्ट' धोरणाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गूगलचे चीफ बिझनेस ऑफिसर फिलिप शिंडलर यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेमोमध्ये नमूद केलंय की, कंपनीनं २०२५ या वर्षाचा शेवट मजबूत स्थितीत केला आहे, परंतु तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याची वेगवान प्रगती पाहता, अशा टीमची गरज आहे जी पूर्णपणे 'AI मिशन'शी सुसंगत असेल. शिंडलर यांनी मेमोमध्ये म्हटलंय की, २०२५ मधील तुमच्या कामगिरीमुळे आम्ही नव्या वर्षाची सुरुवात भक्कमपणे करत आहोत, परंतु बाजारातील स्पर्धा झपाट्यानं बदलत असून आव्हानं मोठी आहेत.

'ऑल इन' राहण्याचं फर्मान

हा प्रस्ताव प्रामुख्याने अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांना गूगलच्या वेगाने बदलणाऱ्या 'AI-फर्स्ट' स्वरूपाशी जुळवून घेणं कठीण जात आहे. शिंडलर यांनी स्पष्ट केलं की, बिझनेस युनिटमधील प्रत्येक सदस्याला AI चा स्वीकार करण्यासाठी "ऑल इन" (पूर्णपणे समर्पित) राहावे लागेल, जेणेकरून कंपनी अधिक मोठा प्रभाव पाडू शकेल. ज्या कर्मचाऱ्यांना या वेगाने काम करण्यात आनंद मिळत नाहीये किंवा जे आता कंपनी सोडून पुढे जाण्यास तयार आहेत, त्यांच्यासाठी कंपनी नुकसान भरपाईसह (सेव्हरन्स) ऐच्छिक निवृत्तीचा पर्याय देत आहे.

या टीम्सवर होणार परिणाम

ही योजना मुख्यत्वे सोल्युशन्स टीम, सेल्स, कॉर्पोरेट डेव्हलपमेंट आणि इतर संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. मात्र, अमेरिकेतील लार्ज कस्टमर सेल्स टीम आणि ग्राहकांशी थेट संबंधित असणाऱ्या इतर भूमिकांना या कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे. शिंडलर यांनी स्पष्ट केले की, जरी GBO मधील सर्व पदे दीर्घकालीन धोरणासाठी महत्त्वाची असली, तरी ग्राहकांवर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्यासाठी या विशिष्ट पदांना 'वॉलंटरी एक्झिट पॅकेज' न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एका वर्षातील तिसरी 'वॉलंटरी एक्झिट' योजना

विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात गूगलनं जाहीर केलेला हा तिसरा वॉलंटरी एक्झिट प्लॅन आहे. कंपनी अनिवार्य कर्मचारी कपात न करता कार्यबलामध्ये बदल करण्यासाठी या पर्यायाचा वापर करत आहे. यापूर्वी जून २०२५ मध्ये 'रिटर्न-टू-ऑफिस' धोरणांतर्गत अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना बायआउटची ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये पुनर्रचनेदरम्यान यूट्यूबच्या कर्मचाऱ्यांना एक्झिट पॅकेज देण्यात आलं होतं. ऑगस्ट २०२५ मध्ये गूगलच्या चीफ पीपल ऑफिसर फियोना सिसकोनी यांनी वॉलंटरी एक्झिट पॅकेजला 'अत्यंत यशस्वी' म्हटलं होतं, कारण याद्वारे कंपनी आपल्या कार्यबलाचे सुसूत्रीकरण करत असून विविध विभागांमधील अतिरिक्त स्तर कमी करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Google offers voluntary exit plan due to AI shift.

Web Summary : Google offers a voluntary exit package to employees in its Global Business Organization (GBO) as it shifts towards an 'AI-first' approach. This is aimed at employees struggling to adapt. Affected teams include Solutions, Sales, and Corporate Development. This is Google's third voluntary exit plan in a year.
टॅग्स :गुगलआर्टिफिशिअल इंटेलिजन्सनोकरी