Join us

खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:08 IST

Banking News: खातेदारांनी त्यांच्या बँकेच्या बचत खात्यांमध्ये दरमहा किमान १० हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक ठेवली नाही, तर त्यांना जबर दंडाला सामोरे जावे लागणार आहे, अशी सूचना या बँकेकडून देण्यात आली आहे.

डीबीएस बँकेने आपल्या खातेदारांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार खातेदारांनी त्यांच्या बँकेच्या बचत खात्यांमध्ये दरमहा किमान १० हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक ठेवली नाही, तर त्यांना जबर दंडाला सामोरे जावे लागणार आहे. ही रक्कम शिल्लक रकमेच्या ६ टक्के किंवा कमाल ५०० रुपये एवढी असेल. 

डीबीएस बँक इंडियाने या संदर्भातील माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून दरमहा सरासरी शिल्लक रक्कम खात्यामध्ये ठेवली नाही तर शिल्लक रकमेच्या ६ टक्के रक्कम एवढा दंड आकारण्यात येईल. त्याची कमाल मर्यादा ही ५०० रुपये एवढी असेल. या बँकेने बचत खात्यांसाठी सरासरी शिल्लक रकमेची किमान मर्यादा ही १० हजार रुपये एवढी असेल. डीबीएस बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातूनही ही माहिती दिली आहे.

डीबीएस इंडियाने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की, १ ऑगस्ट २०२५ पासून तुमच्या बचत खात्याच्या प्रकाराच्या आधारावर नॉन मेन्टेनन्स शुल्कही बदलणार आहे. आता खातेदारांना आधीच्या तुलनेत अधिक सरासरी मासिक शिल्लक कायम न ठेवल्यास दंड भरावा लागेल.  

टॅग्स :बँकिंग क्षेत्रपैसाबँक