Join us

जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 08:52 IST

GST Slabs in India: जीएसटी दरांमध्ये करण्यात आलेल्या बदलांचा फायदा १४० कोटी लोकांना होईल. कपातीनंतरही किंमत केल्या गेल्या नसतील, तर लोकांनी ते निदर्शनास आणून द्यावे. मी तिथे येईल. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे, असे भाष्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. 

नवी दिल्ली : जीएसटीमधील व्यापक बदल 'लोकांसाठी सुधारणा' आहे आणि या पावलाचा देशातील १४० कोटी लोकसंख्येवर सकारात्मक परिणाम होईल. या दर कपातीचा लाभ सामान्य लोकांना देण्यासाठी आम्ही उद्योगांशी बोलत आहोत. २२ सप्टेंबरपासून, जीएसटी दर कपात लागू करण्याच्या तारखेपासूनच लोकांना त्याचा फायदा मिळावा यावर आमचे संपूर्ण लक्ष केंद्रित असेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी सांगितले.

केंद्र आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने बुधवारी जीएसटीचे चारऐवजी दोन स्लॅब करण्याचा निर्णय घेतला. आता कर दर पाच आणि १८ टक्के असतील. तर लक्झरी आणि सिगारेटसारख्या हानिकारक वस्तूंवर ४० टक्के विशेष दर सप्टेंबरपासून लागू होतील. दरांच्या सुसूत्रीकरणाअंतर्गत, टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनरसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू तसेच अन्न आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर दर कमी करण्यात आले आहेत.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, "मी व्यक्तिशः सगळ्या गोष्टींवर नजर ठेवणार आहे. कारण नवीन जीएसटी दर लागू होत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातील लोकांनी मला सांगितले की हे योग्य पाऊल उचलण्यात आले आहे. मी त्यांना सांगितले की, जर तुम्हाला जीएसटी कपातीचा फायदा मिळत नसेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. मी तिथे येईन. जर कुणी वस्तुंच्या किंमती कमी केल्या नाही. तर लोकांनी त्याची माहिती द्यावी", असे आवाहन सीतारामन यांनी केले. 

तीन दिवसांत नोंदणी शक्य

सीतारमण म्हणाल्या, "ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ९० टक्के परतफेड निश्चित वेळेत आपोआप मंजूर होतील. तसेच, कंपन्या तीन दिवसांत यशस्वीरित्या स्वतःची नोंदणी करू शकतील. म्हणूनच, याचा लोकांवर आणि कंपन्यांवर, विशेषतः लघु उद्योगांवर, शेतकऱ्यांवर सर्वांगीण सकारात्मक परिणाम होईल. कारण ते खरेदी करतील ती उपकरणे, ते खरेदी करतील ती कीटकनाशके, हे सर्व स्वस्त होणार आहेत."

काही राज्यांना महसुलाबाबत चिंता

जीएसटी कपातीबाबत राज्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत सीतारमण म्हणाल्या, 'लोकांना याचा फायदा मिळाला पाहिजे यासाठी जीएसटी कौन्सिलमध्ये एकमत झाले होते. मात्र, काही राज्ये निश्चितच महसुलाबद्दल चिंतेत होती. परंतु दरांमध्ये कपात केल्याने सर्वांना फायदा झाला पाहिजे यावर एकमत झाले.

उद्योगांशी चर्चा

सीतारामन म्हणाल्या की, जीएसटी दरांमध्ये कपात केल्याने वस्तूंच्या किमती कमी होतील आणि वापर वाढेल आणि यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि महसूल वाढेल. आम्ही उद्योगांशी बोलून दर कपातीचा फायदा सर्वसामान्यांना मिळावा यासाठी बोलत आहोत. अनेक कंपन्यांनीही किमतीत कपातीची घोषणा केली आहे. २२ सप्टेंबरपासून लोकांना याचा फायदा मिळावा यावर माझे संपूर्ण लक्ष असेल.

जीएसटीमध्ये व्यापक बदल हा लोकांसाठी एक सुधारणा आहे आणि या पायरीचा देशातील १४० कोटी लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. याचा गरीबातील गरीबांवर काही सकारात्मक परिणाम होईल. ही केवळ दर कपातीची बाब नाही तर कंपन्यांसाठीही गोष्टी सोप्या होतील. परतफेडीची बाब असो किंवा अनुपालनाची किंवा नोंदणीची, या बाबी त्यांच्यासाठी सोप्या होतील.- निर्मला सीतारमण, अर्थमंत्री

टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामनकरकेंद्र सरकार