भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. राजकारणामुळे अमेरिकन विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, तर त्याचा दीर्घकालीन फटका अमेरिकेला बसेल, असं त्यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी नेहमीच अमेरिकन इनोव्हेशन आणि आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत. पण सध्याच्या धोरणांमुळे हा फायदा कमी होऊ शकतो, असं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले. ट्रम्प प्रशासन आणि विद्यापीठांमध्ये संघर्ष सुरू असताना राजन यांनी हे वक्तव्य केलंय.
'सर्गेई ब्रिन यांच्यासारखे लोक विद्यार्थी म्हणून आले आणि त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठं काम केलं. अमेरिकेच्या विकासासाठी विद्यापीठं किती महत्त्वाची आहेत आणि तो विकास लोकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांची किती भूमिका आहे, याची जाणीव विद्यापीठांना करून देण्याची गरज आहे, असं गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांचं उदाहरण देताना राजन यांनी नमूद केलं. ब्रिन १४६ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानावर आहेत. त्यांनी लॅरी पेज यांच्यासोबत गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटची स्थापना केली.
केवळ टेकच नाही तर HR प्रोफेशनल्सचीही नोकरी खाऊ लागला AI; IBM नं ८००० कर्मचाऱ्यांना काढलं
कसा सुरू झाला हा वाद
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये राजन हे फायनान्सचे प्राध्यापक आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यानं अमेरिकेतील नोकऱ्यांवरही परिणाम होईल. गुगलसारख्या कंपन्या हजारो लोकांना रोजगार देतात आणि परदेशी विद्यार्थ्यांचाही यात मोठा वाटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ट्रम्प प्रशासन आणि विद्यापीठांमधील संघर्षाची सुरुवात हार्वर्ड आणि कोलंबियासारख्या मोठ्या विद्यापीठांमध्ये ज्यू विरोधी द्वेषापासून सुरू झाली.
ट्रम्प प्रशासनानं आणखी कठोरपणा दाखवत विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती थांबवण्याचे आदेश अमेरिकी दूतावासांना दिले आहेत. त्यांना आता विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणी अधिक कडक करण्यास सांगण्यात आलंय. राजन म्हणाले की, सध्या वातावरण चांगले नाही. व्हिसा सुरक्षा आणि व्हाईट हाऊसच्या कारवाईबाबत शिक्षक आणि प्रशासकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
किती परदेशी विद्यार्थी
या वातावरणामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत विद्यापीठांचे योगदान कमी होत आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येत परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण ५.९ टक्के आहे. अमेरिकेत सुमारे एक कोटी ९० लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात ११ लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अमेरिकेत आले. यात सर्वाधिक विद्यार्थी भारतातील असून त्या खालोखाल चीनचा क्रमांक लागतो.
परदेशी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची तुलना राजन यांनी गुंतवणूक करताना कंपन्यांना येणाऱ्या अडचणींशी केली. जर अनिश्चितता वाढली तर तुम्ही एकतर गुंतवणूक पुढे ढकलता किंवा सर्व काही निश्चित असलेल्या ठिकाणी हलवता. म्हणजेच अमेरिकेत शिक्षण घेणं अवघड आहे असे विद्यार्थ्यांना वाटत असेल तर ते दुसऱ्या देशात जाऊ शकतात, असंही ते म्हणाले.