Apple Ceo Tim Cook : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना आयफोनचे उत्पादन भारताऐवजी अमेरिकेत हलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, टिम कुक यांनी ट्रम्प यांचा हा सल्ला मानण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. अॅपलचे उत्पादन भारतातच सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पण, खरंच अॅपल कंपनीचे उत्पादन युनिट अमेरिकेत हलवणे सोपं आहे का? टीम कुक यांनी नकार देण्यामागे नेमकं काय कारण आहे? चला यापाठीमागचं आर्थिक गणित समजून घेऊ.
दरम्यान, ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या एका अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, जर अॅपलने आपले उत्पादन अमेरिकेत हलवले, तर कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोट्यवधी रुपयांच्या कमाईवर परिणाम होईल. सोबतच भारतात काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात.
भारतात उत्पादन स्वस्तअहवालात म्हटले आहे की, अॅपलला भारतात एक आयफोन तयार करण्यासाठी सुमारे ३० अमेरिकन डॉलर्स खर्च येतो. भारत सरकारच्या पीएलआय (PLI - Production Linked Incentive) योजनेमुळे हा खर्च आणखी कमी होतो. अॅपल हाच फोन अमेरिकेत सुमारे १००० डॉलर्सला विकतो, ज्यामध्ये भारताचा वाटा केवळ ३० डॉलर्स असतो.
जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले की, आयफोनच्या अंतिम जोडणीचे (असेम्ब्ली) काम भारतात होते. जर अॅपलने हे काम अमेरिकेत हलवले, तर त्याचा थेट परिणाम या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होईल आणि त्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. मात्र, भारताकडे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत.
अॅपल गेल्यास भारताकडे काय पर्याय?जीटीआरआयच्या संस्थापकांच्या मते, जर अॅपलने भारत सोडण्याचा निर्णय घेतला, तर निश्चितपणे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. पण, या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सेमीकंडक्टर (Semiconductor) आणि बॅटरी (Battery) तसेच डिस्प्ले तंत्रज्ञानात (Display Technology) स्वतःची बाजू अधिक मजबूत करू शकतो.
आयफोनच्या निर्मितीतील खर्चअहवालात १००० अमेरिकन डॉलर्सच्या आयफोनच्या निर्मितीतील खर्चाची विभागणी देखील करण्यात आली आहे. त्यानुसार, आयफोनच्या भागांवर (भौतिक उपकरणे) ४५० डॉलर्स खर्च होतात. यामध्ये अमेरिकेतील क्वालकॉम (Qualcomm) आणि ब्रॉडकॉम (Broadcom) यांसारख्या कंपन्यांना चिप उत्पादनासाठी ८० डॉलर्स, तैवानला १५० डॉलर्स, दक्षिण कोरियाला ओएलईडी (OLED) आणि मेमरी घटकांसाठी ९० डॉलर्स आणि जपानला कॅमेऱ्यांसाठी ८५ डॉलर्स मिळतात. जर्मनी, व्हिएतनाम आणि मलेशिया ४५ डॉलर्सचे योगदान देतात. तर, भारत आणि चीन या दोन्ही देशांकडे केवळ ३० अमेरिकन डॉलर्स किमतीचे शेअर्स आहेत. मात्र, हे दोन्ही देश आयफोनच्या अंतिम जोडणीसाठी (Final Assembly) संपूर्ण बेस तयार करतात आणि तो अॅपलला पुरवतात.
वाचा - भारतीय सैन्यांची संवेदनशील माहिती चीनमध्ये जातेय? EaseMyTrip च्या CEO कडून स्क्रिनशॉट शेअर
या अहवालावरून हे स्पष्ट होते की, अॅपलसाठी भारतात उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. भारतातून उत्पादन हलवल्यास कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागू शकते. तसेच, भारतासाठीही अॅपल एक महत्त्वाचा रोजगार आणि उत्पादन स्रोत आहे.