Join us
Daily Top 2Weekly Top 5

हायब्रिड ATM मधून निघणार ₹१०, ₹२० आणि ₹५० च्या नोटा; टंचाई दूर करण्यासाठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:59 IST

केंद्र सरकार १०, २० आणि ५० रुपयांसारख्या लहान मूल्याच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहे. पाहा काय आहे हायब्रिड एटीएम.

केंद्र सरकार १०, २० आणि ५० रुपयांसारख्या लहान मूल्याच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहे. नोटबंदीच्या जवळपास एक दशकानंतरही दैनंदिन व्यवहारात जाणवणारी सुट्या पैशांची कमतरता दूर करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

नवीन प्रस्तावांमध्ये काय आहे?

'लाइव्ह मिंट'नं दिलेल्या वृत्तानुसार, सरकार अशा एका मशीनवर काम करत आहे जी मागणीनुसार १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा जारी करेल. याशिवाय, एका 'हायब्रिड एटीएम'चा (Hybrid ATM) प्रस्तावही विचाराधीन आहे, जो मोठ्या नोटांचं रूपांतर लहान नोटा आणि नाण्यांमध्ये करेल. तसंच, रिझर्व्ह बँकेवर लहान मूल्याच्या नोटा अधिक छापण्यासाठी आग्रह धरण्याचीही योजना आहे.

EU आणि भारतादरम्यानच्या ऐतिहासिक फ्री ट्रेड डीलची घोषणा; पंतप्रधान म्हणाले, "भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या..."

पायलट प्रोजेक्टअंतर्गत चाचणी सुरू

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, कमी मूल्याच्या नोटा देणाऱ्या मशीनच्या प्रोटोटाइपची मुंबईत एका पायलट प्रोजेक्टअंतर्गत चाचणी सुरू आहे. या प्रणालीला मंजुरी मिळाल्यास ती देशभरात लागू केली जाईल. ही मशीन्स रेल्वे स्थानकं, बाजारपेठा, रुग्णालये आणि सरकारी कार्यालये यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी बसवण्यात येतील.

हायब्रिड एटीएम कसं काम करेल?

हायब्रिड एटीएम हे पारंपारिक एटीएम आणि कॉइन वेंडिंग मशीनचे एकत्रित रूप असेल. या मशीनद्वारे युजर्स मोठ्या नोटा टाकून त्या बदल्यात लहान नोटा आणि नाणी मिळवू शकतील. आरबीआयनं मुंबईतील बँक ऑफ बडोदाच्या एका शाखेत या मॉडेलची याआधीच चाचणी केली आहे.

या पुढाकाराची गरज का आहे?

दैनंदिन व्यवहारात ५०० रुपयांच्या नोटेचे सुटे पैसे मिळवताना दुकानदार आणि ग्राहक दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे व्यवहारांना उशीर होतो किंवा वादाचे प्रसंग उद्भवतात, अशा ठिकाणी या पावलाचा मोठा फायदा होईल.

चलनातील नोटांची आकडेवारी

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, चलनात असलेल्या एकूण चलनापैकी ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ४१.२% आहे, तर मूल्याच्या बाबतीत त्यांचा हिस्सा ८६% इतका प्रचंड आहे. याउलट, लहान मूल्याच्या नोटा (२, ५, १०, २० आणि ५० रुपये) चलनाच्या एकूण प्रमाणात ३८% असल्या तरी, एकूण मूल्यामध्ये त्यांचा वाटा केवळ ३.१% आहे. उर्वरित हिस्सा १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा आहे.

तज्ज्ञांचं मत काय?

'भारत रेटिंग्स अँड रिसर्च'चे मुख्य अर्थशास्त्री देवेंद्र पंत यांच्या मते, लहान नोटांच्या अधिक उपलब्धतेमुळे दैनंदिन व्यवहार सुलभ होतील, विशेषतः ग्रामीण भागात जिथे आजही फीचर फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, काही बँकिंग तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, केवळ मशीन लावून ही समस्या सुटणार नाही; त्यासाठी नोटांची छपाई आणि पुरवठा साखळी वाढवणंही तितकंच आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hybrid ATMs to Dispense ₹10, ₹20, ₹50 Notes: Tackling Change Shortage

Web Summary : Government explores hybrid ATMs dispensing small denomination notes (₹10-₹50) to ease cash crunch. Pilot projects are underway, testing machines in crowded areas. These ATMs combine traditional functions with coin vending, enabling users to exchange larger notes. Increased printing and supply chain improvements are crucial for success.
टॅग्स :पैसाबँक