Join us

HP India: नोकरकपातीचे सत्र सुरुच! Twitter, Metaनंतर आता ‘ही’ कंपनी ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:01 IST

HP India: मंदावलेली विक्री आणि आर्थिक विवंचनेमुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

HP India: गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा येऊ शकणाऱ्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेकविध कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करताना दिसत आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय जाहीर केला. यातच आता आघाडीची टेक कंपनीनेही सुमारे ४ हजार ते ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे. 

या कंपनीचे नाव HP Inc आहे. या कंपनीचे सीईओ एनरिक लोरेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अस्थिर मॅक्रो वातावरण आणि मागणी कमी झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे. HP Inc ची टाळेबंदी हे सूचित करते की जगातील अनेक देशांमध्ये मंदीची भीती अधिक गडद होत आहे. तसेच कंपनीने डेस्कटॉप विक्री थांबवण्याच्या निर्णयामागील एक कारण नमूद केले आहे. यामुळे पर्सनल कॉम्प्युटर कंपन्यांना अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

ग्राहक महसुलात वर्षभरात २५ टक्क्यांची घट 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, चौथ्या तिमाहीत त्यांच्या संगणक विभागाच्या विक्रीत १३ टक्के घट झाली असून ती १०.३ अब्ज डॉलरवर आली आहे. यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहक महसुलात वर्षभरात २५ टक्क्यांची घट झाली आहे. कंपनी येत्या ३ वर्षात ४ हजार ते ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत HP मध्ये सुमारे ५१ हजार कर्मचारी होते. सन २०१९ मध्ये HP कंपनीने घोषणा केली होती की, ते ७ हजार ते ९ हजार कर्मचारी काढून टाकतील. त्यानंतर आता हा निर्णय घेतला गेला आहे. HP Inc मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्‍यांच्या सुमारे १० टक्के असल्याचे म्हटले जात आहे. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. 

दरम्यान, एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, चौथ्या तिमाहीतील महसुलात ११.२ टक्क्यांनी घट झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत १४.८ अब्ज डॉलर नोंदवली गेली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :व्यवसायतंत्रज्ञाननोकरी