Join us

निवृत्तीनंतर ७५,००० रुपये पेन्शन अन् ७५ लाखांचा बॅलन्स! फक्त 'एवढीच' वर्षे NPS मध्ये गुंतवणूक करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:50 IST

NPS Subscribers : अनेकदा नोकरीच्या सुरुवातीला प्रत्येकाला गुंतवणूक करणे शक्य होत नाही. पण, त्याच्या ८ ते १० वर्षानंतर जरी तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात केली तरी तुम्ही मोठा निधी उभा करू शकता.

Pension Scheme NPS : नोकरीला लागताच बचत करणे किंवा गुंतवणूक सुरू करणे प्रत्येकाला जमत नाही. सुरुवातीला पगार कमी आणि स्वप्न जास्त पूर्ण करायची असल्याने जेमतेमच पैसे हातात राहतात. पण, जेव्हा तुम्हाला नोकरीचा ८ ते १० वर्षांचा अनुभव येतो आणि तुम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळवता, तेव्हा निवृत्तीच्या नियोजनाकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. अगदी तुम्ही ३५ वर्षांचे झाला असाल तरी, तुमच्याकडे निवृत्तीसाठी चांगली गुंतवणूक सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ आहे!

जर तुम्ही या वयात सरकारी राष्ट्रीय पेन्शन सिस्टिममध्ये दरमहा नियमितपणे गुंतवणूक केली, तर तुमचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्णपणे तणावमुक्त होऊ शकते.

३५ व्या वर्षीही इक्विटीमध्ये गुंतवणुकीची संधीएनपीएसमध्ये बिगर-सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या ग्राहकांसाठी LC75, LC50 आणि LC25 असे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये, वयाच्या ३५ वर्षांपर्यंतच्या लोकांना इक्विटीमध्ये (शेअर बाजारात) ७५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवू शकता, जिथे जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

'ॲक्टिव्ह चॉईस' पर्यायामध्ये, ५० वर्षांच्या वयापर्यंत तुम्हाला इक्विटीमध्ये ७५ टक्के एक्सपोजर मिळते, जे नंतर हळूहळू कमी होते. त्यामुळे, तुम्ही ३५ ते ४० वर्षांच्या वयातही या योजनेत सामील झाल्यास, संभाव्य उच्च परताव्याचा चांगला फायदा घेऊ शकता.

कॅल्क्युलेटर : ७५,००० रुपये पेन्शन आणि ७५ लाख कसे मिळतील?चला, एका उदाहरणाने समजून घेऊया की वयाच्या ३५ व्या वर्षापासून तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला काय मिळू शकते.

  • सुरुवातीचे वय : ३५ वर्षे
  • गुंतवणूक कालावधी : २५ वर्षे (वय ६० पर्यंत)
  • एनपीएसमध्ये दरमहा गुंतवणूक : १०,००० रुपये
  • दरवर्षी गुंतवणुकीत वाढ (टॉप-अप) : ५%
  • गुंतवणुकीवर अंदाजे परतावा : वार्षिक १०%

यानुसार, वयाच्या ६० व्या वर्षी तुमच्याकडे १,८८,३९,७१३ (सुमारे १.८८ कोटी) एवढा मोठा निधी जमा होईल!

निवृत्तीनंतर पेन्शन आणि एकरकमी निधीचे गणित

  • पेन्शनसाठी ॲन्युइटीमध्ये गुंतवणूक : ६०%
  • अंदाजित ॲन्युइटी दर : ८%
  • या धोरणानुसार, तुम्हाला जमा झालेल्या निधीपैकी ७५,३५,८८५ रुपये (सुमारे ७५ लाख) ही रक्कम एकरकमी मिळेल, जी करमुक्त असेल. तर, उर्वरित १,१३,०३,८२८ (सुमारे १.१३ कोटी रुपये) ही रक्कम ॲन्युइटी योजनेत गुंतवली जाईल. या गुंतवणुकीतून तुम्हाला दरमहा सुमारे ७५,३५९ रुपये (सुमारे ७५,०००) पेन्शन मिळू लागेल.

एनपीएसचे नियम आणि परतावा इतिहाससध्याच्या नियमांनुसार, निवृत्तीच्या वेळी एकूण निधीच्या ६० टक्के रक्कम एकरकमी काढता येते, जी करमुक्त असते. उर्वरित ४० टक्के रक्कम पेन्शनसाठी ॲन्युइटी योजनेत गुंतवावी लागते. जर तुमचा एकूण निधी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्ही ॲन्युइटी न खरेदी करता संपूर्ण रक्कम काढू शकता, आणि ती रक्कमही करमुक्त असते.

एनपीएस ही एक सरकारी गुंतवणूक योजना असून, ती निवृत्तीनंतरच्या पेन्शनसाठी खास डिझाइन केलेली आहे. यामध्ये तुमच्या जमा केलेल्या रकमेचा काही भाग इक्विटीमध्ये गुंतवला जातो, त्यामुळे ही योजना 'हमी परतावा' देऊ शकत नाही. तरीही, ती पीपीएफ सारख्या पारंपारिक दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देऊ शकते. एनपीएसच्या इतिहासात, या योजनेने आतापर्यंत सरासरी ९% ते १२% वार्षिक परतावा दिला आहे.

वाचा - रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी

त्यामुळे, जरी तुम्हाला गुंतवणुकीसाठी थोडा उशीर झाला असेल किंवा तुम्ही ३५ व्या वर्षात असाल, तरी एनपीएसमध्ये योग्य नियोजन करून तुम्ही निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि तणावमुक्त बनवू शकता.

 

टॅग्स :निवृत्ती वेतनगुंतवणूकशेअर बाजार