Join us  

नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला? आरबीआयला माहितच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 10:08 PM

नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे.

नवी दिल्ली, दि. 4 - नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे. तसेच 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटा बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये किती बेहिशोबी काळा पैसा पांढरा झाला याचाही आकडा आपल्याकडे नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत 15.28 लाख कोटी किमतीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. तसेच अधिक तपासानंतर अचूक आकडा हाती येईल, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. मात्र 8 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, तसेच अन्य लाभ होतील असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.  दरम्यान,  नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या सुमारे 99 टक्के नोटा चलनात परत आल्याचे समोर आल्यानंतर नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. रिझ्रर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही या निर्णयावर टीका करताना  नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले होते.  रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी जाहीर करताना बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्या आहेत. केवळ १ टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत, असे या आकडेवारीत नमूद केले होते. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या ६,७00 दशलक्ष नोटांपैकी फक्त ८९ दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत. बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत. १ हजार रुपयांच्या १.३ टक्के नोटा बँकांत जमा झालेल्या नाहीत. त्यांची किंमत ८.९ कोटी रुपये आहे.रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात नोटाबंदीची आकडेवारी जाहीर केली आहे. अहवालात म्हटले आहे की, यंदा नोटा छपाईवर ७,९६५ कोटी रुपये खर्च झाले. गेल्या वित्तवर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. गेल्या वित्तवर्षात हा आकडा ३,४२१ कोटी रुपये होता. सरकारी आकडेवारीनुसार २ हजार रुपयांच्या ३,२८५ दशलक्ष नोटा सध्या चलनात आहेत.

टॅग्स :नोटाबंदीभाजपानरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँक