Join us

किमती वाढल्याने घरे विक्री घटणार; परवानगी मिळण्यात झालेल्या विलंबाचाही बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:46 IST

यंदा देशातील प्रमुख ७ शहरांतील घरांच्या किमती २१ टक्के वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : वर्ष २०२४ मध्ये देशातील ७ प्रमुख शहरांतील घरांची विक्री ४ टक्के घटून ४.६ लाख युनिटवर येण्याचा अंदाज वास्तव संपदा (रिअल इस्टेट) सल्लागार संस्था ‘ॲनारॉक’ने जारी केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

मूल्याच्या दृष्टीने मात्र घरांची विक्री १६ टक्के वाढून ५.६८ लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. ‘ॲनारॉक’च्या अहवालानुसार, जमीन, श्रम आणि बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्यामुळे यंदा देशातील प्रमुख ७ शहरांतील घरांच्या किमती २१ टक्के  वाढल्या आहेत.

‘ॲनारॉक’ ही भारतातील आघाडीची निवास ब्रोकरेज कंपन्यांपैकी एक आहे. २०२४ मधील विक्रीतील घसरगुंडीसाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे नियामकीय परवानग्यांना झालेला उशीर आणि गृहनिर्माण योजनांतील घट या बाबी जबाबदार असल्याचे कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.

किती घरे विकली जाणार?

२०२४ मध्ये ७ प्रमुख शहरांत एकूण ४,५९,६५० घरांची विक्री होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये हा आकडा ४,७६,५३० इतका होता. २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या घरांची विक्री किंमत ५.६८ लाख कोटी रुपये इतकी होईल.

गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या घरांची किंमत ४.८८ लाख कोटी रुपये होती. ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत थोडीशी घट झाली असली तरी किमतीतील वाढीमुळे ही घट भरून निघाली आहे. 

टॅग्स :सुंदर गृहनियोजन