Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत रिलायन्सच्या सहकार्याने उभारली जाणार 'ऐतिहासिक' रिफायनरी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:55 IST

Donald Trump Oil Refinery In America: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये प्रस्तावित असलेल्या एका महाकाय ऑईल रिफायनरी प्रकल्पात भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज सहकार्य करत असल्याची घोषणा केली आहे.

Donald Trump Oil Refinery In America: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये प्रस्तावित असलेल्या एका महाकाय ऑईल रिफायनरी प्रकल्पात भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज सहकार्य करत असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या प्रकल्पाचं वर्णन अमेरिकन ऊर्जा क्षेत्रासाठी 'ऐतिहासिक' असं केलं असून, देशाची ऊर्जा संरचना मजबूत करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असल्याचं म्हटलंय. आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर केलीये. "हा ३०० अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार असून अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार आहे. हा अमेरिकन कामगार, ऊर्जा उद्योग आणि दक्षिण टेक्सासमधील लोकांसाठी मोठा विजय आहे," असं ते म्हणाले.

ब्राउन्सविले येथे नवी रिफायनरी उभारणार

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या माहितीनुसार, ही रिफायनरी 'अमेरिका फर्स्ट रिफायनिंग' नावाच्या कंपनीद्वारे टेक्सासमधील ब्राउन्सविले बंदरावर विकसित केली जाईल. गेल्या जवळपास ५० वर्षांत अमेरिकेत बांधली जाणारी ही पहिलीच नवीन ऑईल रिफायनरी असेल. हा प्रकल्प देशाची ऊर्जा पायाभूत सुविधा आणि देशांतर्गत रिफायनिंग क्षमता बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. परंतु, सध्या या गुंतवणुकीची आर्थिक रचना किंवा फंडिंगबाबत सविस्तर माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

Post Office मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, मिळणार सरकारची गॅरेंटी

रिलायन्स आणि भारतीय भागीदारांचे मानले आभार

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये भारतातील सर्वात मोठी खाजगी ऊर्जा कंपनी 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चा विशेष उल्लेख करत भारतीय भागीदारांचे आभार मानलेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीबद्दल बोलताना त्यांनी, "भारतातील आमचे भागीदार आणि त्यांची सर्वात मोठी खाजगी ऊर्जा कंपनी रिलायन्स यांना या भव्य गुंतवणुकीसाठी धन्यवाद," असं म्हटलंय.

'अमेरिका फर्स्ट' धोरणांतर्गत गुंतवणूक आणि फायदे

ट्रम्प यांनी सांगितलं की, त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणामुळे, परवाना प्रक्रिया सुलभ केल्यामुळे आणि करात कपात केल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. त्यांच्या मते, ब्राउन्सविले येथे बनणारी ही रिफायनरी अमेरिकन बाजारपेठेला अधिक इंधन उपलब्ध करून देईल. याशिवाय ती राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करेल, ऊर्जा उत्पादनात वाढ करेल, हजारो नवीन रोजगार निर्माण करेल. याला जगातील सर्वात स्वच्छ रिफायनरी बनवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

तणाव आणि तेल दरवाढीच्या चिंतेदरम्यान मोठी घोषणा

ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा इराणशी संबंधित प्रादेशिक तणाव आणि जागतिक पुरवठ्यातील संभाव्य अडथळ्यांमुळे तेलाच्या किमतींबाबत चिंता वाढली आहे. अमेरिकन प्रशासन ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यातून तेल सोडणं आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकरना लष्करी सुरक्षा प्रदान करणं यांसारख्या पर्यायांचा विचार करत आहे.

प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि आव्हानं

ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा प्रकल्प पूर्वीच्या 'एलिमेंट फ्युएल्स'द्वारे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाशी संबंधित असू शकतो. जून २०२४ मध्ये कंपनीनं सांगितलं होते की त्यांनी जागेची तयारी पूर्ण केली असून दररोज सुमारे १.६ लाख बॅरल क्षमतेची रिफायनरी बांधण्यासाठी आवश्यक परवाने मिळवले आहेत. जरी या नवीन प्रस्तावाबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा अमेरिका फर्स्ट रिफायनिंगकडून अद्याप अधिकृत विधान आलेलं नसलं तरी, रिफायनिंग क्षेत्रासमोर अनेक आव्हानं आहेत. अमेरिकेत शेल क्रांतीमुळे तेल उत्पादन वाढलं असलं तरी रिफायनिंग क्षमता त्या प्रमाणात वाढलेली नाही. नवीन रिफायनरी स्थापन करणं हे महागड्या गुंतवणुकीसह, जटिल परवाना प्रक्रिया आणि पर्यावरणीय विरोध यामुळे आव्हानात्मक मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Reliance to partner in US refinery project, Trump announces.

Web Summary : Reliance will partner in a massive Texas oil refinery project. Trump hailed it as 'historic,' strengthening US energy. The $300 billion deal, via America First Refining, aims to boost domestic refining, create jobs, and enhance national security, amid global oil concerns.
टॅग्स :डोनाल्ड ट्रम्परिलायन्सतेल शुद्धिकरण प्रकल्प