Salary Hike Update : सध्या आयटी क्षेत्रात पगारवाढीवरुन नाराजी पसरली आहे. अनेक दिग्गज कंपन्यांनी गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली नाही. यात इन्फोसिस सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत एका आयटीने कंपनीने विचित्र निर्णय घेतला आहे. या कंपनीने वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सोडून कनिष्ठ लोकांचाच पगार वाढवला आहे. तर सिनियर्स गेल्या २ वर्षांपासून पगारवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे या कंपनीचे मालक त्यांच्या दातृत्वासाठी जगभर ओळखले जातात.
शिव नाडर यांच्या नेतृत्वाखालील आयटी कंपनी एचसीएल टेकमध्ये हे घडलंय. कंपनीने २ वर्षांपासून आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केलेली नाही. या आर्थिक वर्षात ९ महिने उलटले तरी अद्याप आशा नाही. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार कनिष्ठ कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांच्या विलंबानंतर किरकोळ पगारवाढ मिळाली आहे. या स्तरावरून बहुतांश कर्मचाऱ्यांचे वेतन केवळ एक ते दोन टक्क्यांनी वाढले आहे. अव्वल कामगिरी करणाऱ्यांच्या पगारात तीन ते चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हे एचसीएल व्यवस्थापनाच्या नियमाविरुद्ध आहे. यामध्ये सरासरी ७ टक्के आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना १२-१५ टक्के पगारवाढ देण्याची घोषणा करण्यात आली होती.
आयटी उद्योगांपुढे जागतिक आव्हानदेशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज इतर आयटी कंपन्यांप्रमाणेच जागतिक स्तरावर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करत आहे. जागतिक आव्हानांमुळे नफ्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून कंपनी पगारवाढीबाबत सावध पावले उचलत आहे. कारण, कोणत्याही कंपनीत वेतन बिल हा तिच्या वार्षिक बजेटचा मोठा भाग असतो. एचसीएलने सांगितले की, दरवर्षी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या कंपनीत सामील होतात. त्यांना एक वर्षानंतरच वेतनवाढ मिळू शकते. ज्यांना वर्ष पूर्ण झालंय, त्यांना पगारवाढ मिळाली आहे. याशिवाय, पगारवाढीच्या वेळी कामगिरी देखील खूप महत्त्वाची असते.
कंपनीने केला खुलासा
याबाबत आता कंपनीने खुलासा केला आहे. आम्ही लवकरच पगारवाढ करण्याच्या विचारात आहोत. गेल्या वर्षी जे केले होते, त्याप्रमाणेच यंदाही होईल. सरासरी 7% वाढ दिली जाते. परंतु, नेहमीप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांना 12-15% वाढ दिली जाईल. आम्ही आमच्या वाढीचे नियोजन केले असून, सर्व या महिन्यापासून लागू होईल.
नारायण मूर्ती यांच्या कंपनीनेही पगारवाढ पुढे ढकललीपगारवाढीला विलंब करणारी HCL ही देशातील पहिली आयटी कंपनी नाही. याआधी नारायण मूर्ती यांची कंपनी इन्फोसिसनेही आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ पुढे ढकलली आहे. आता ९ महिन्यांनी असे संकेत दिले जात आहेत. मात्र, त्याचीही घोषणा अद्याप झालेली नाही.