Russia Crude Oil: भारत आता रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत नाही, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. पण या वक्तव्यानंतर काही तासांनी भारत सरकारच्या सूत्रांनी असं अजिबात नसल्याचं स्पष्ट केलंय. एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या अजूनही रशियन पुरवठादारांकडून तेल खरेदी करत आहेत. जलद खरेदीचे निर्णय किंमत, कच्च्या तेलाची गुणवत्ता, साठवणूक, लॉजिस्टिक्स आणि इतर आर्थिक घटकांवर आधारित असतात.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि त्यामागे स्पष्ट कारणं आहेत. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा उत्पादक देश आहे. रशिया दररोज सुमारे ९.५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन करतो, जे जगाच्या गरजेच्या सुमारे १०% आहे. इतकंच नव्हे तर रशिया दररोज सुमारे ४५ लाख बॅरल कच्चे तेल आणि २३ लाख बॅरल रिफाइंड तेल विकतो.
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
कठीण परिस्थितीत योग्य निर्णय
मार्च २०२२ मध्ये रशियाचं कच्चे तेल जागतिक बाजारातून बाहेर पडल्यास तेलाच्या पुरवठ्यात मोठा व्यत्यय येऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. याच भीतीपोटी त्यावेळी ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १३७ डॉलरवर पोहोचला होता, जो अतिशय जास्त आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतानं समजूतदारपणा दाखवला. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा वापरणारा देश आहे आणि ८५ टक्के कच्चं तेल परदेशातून खरेदी करतो. त्यामुळे स्वस्तात कच्चे तेल मिळावे म्हणून भारतानं आपल्या खरेदी धोरणात बदल केला.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असं आपण ऐकलंय, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितलं. हे खरे आहे की नाही हे आपल्याला माहित नाही, परंतु जर असं होत असेल तर ते चांगलं पाऊल आहे, असंही ते म्हणाले. यापूर्वी ट्रम्प यांनी रशियाकडून कच्च तेल खरेदी केल्यास भारताकडून दंड वसूल केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. परंतु किती दंड आकारला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं नाही. याचं कारण भारताचा रशियाबरोबरचा वाढता व्यापार, विशेषत: कच्च तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी आहे.
भारतानं काय म्हटलं?
भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद केली आहे का, असे विचारलं असता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'भारत कच्च्या तेलाची खरेदी कुठून करणार, हे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती आणि काळाच्या गरजेनुसार ठरवलं जातं. गेल्या आठवड्यात तेल खरेदी बंद करण्यात आली का, या प्रश्नाची आपल्याला माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं.