Join us  

₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:14 PM

HAL Share Price: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 जून नंतर शेअर बाजाराचा मूड कसा असेल याबद्दल भाष्य केलं होतं. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

HAL Share Price: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 4 जून नंतर शेअर बाजाराचा (Share Market) मूड कसा असेल याबद्दल भाष्य केलं होतं. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ज्या शेअरचा उल्लेख केला होता, त्या शेअरनं गेल्या ५ वर्षात १३२० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आम्ही बोलत आहोत पीएसयू स्टॉक हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL Share Price) अर्थात एचएएलबद्दल. हा शेअर आज ४७५० रुपयांवर उघडला आणि ४८७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो दोन टक्क्यांनी वधारून ४८३० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. 

एचएएलच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर २८ मार्च २०१८ पासून केवळ ७५० टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२१ नंतर या शेअरनं वेग घेतला आणि २०२२ पर्यंत तो ५४४.४८ रुपयांवरून ११३५ रुपयांवर पोहोचला. डिसेंबर २०२३ मध्ये शेअरनं २७०० चा टप्पा ओलांडला. गेल्या ५ दिवसांत जवळपास २१ टक्के परतावा दिला आहे. एका महिन्यात सुमारे २८ टक्के आणि सहा महिन्यांत १२५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यंदा त्यात ७१ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. वर्षभरात या शेअरनं ३ पटीने अधिक परतावा दिला आहे. 

काय म्हणालेले मोदी? 

सरकारी कंपन्यांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मत व्यक्त केलं, सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे गुंतवून लोक मालामाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांचे शेअर्स १० पटींपेक्षा अधिक वाढले असल्याचं मोदी म्हणाले होते. सरकारनं पीएसयूना रिफॉर्म केलंय.  

यापूर्वी पीएसयूचा अर्थ घसरणं हा होता. परंतु आता शेअर बाजारात त्यांचं मूल्य वाढत आहे. एचएएलकडे पाहा. त्याबाबात कर्मचार्यांना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चौथ्या तिमाहीत एचएएलनं विक्रमी नफा मिळवला आणि ही मोठी प्रगती आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :नरेंद्र मोदीशेअर बाजारगुंतवणूकसरकार