Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेव टागोरांनी केले साबणासाठी ‘मॉडेलिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:50 IST

आपले उत्पादन उत्तम दर्जाचे आहे हे ग्राहकांना पटवण्यासाठी एखाद्या नामवंत व्यक्तीच्या शिफारसीचा आधार घेणे ही जाहिरात क्षेत्रातली  सर्वमान्य पद्धत! लक्ससारख्या साबणाने  देशोदेशीच्या चित्रतारकांना घेऊन आपल्या जाहिरातींनी स्वतःचे एक वेगळेपण प्रस्थापित केले आहे. 

- दिलीप फडके(विपणनशास्त्राचे अभ्यासक)आपले उत्पादन उत्तम दर्जाचे आहे हे ग्राहकांना पटवण्यासाठी एखाद्या नामवंत व्यक्तीच्या शिफारसीचा आधार घेणे ही जाहिरात क्षेत्रातली  सर्वमान्य पद्धत! लक्ससारख्या साबणाने  देशोदेशीच्या चित्रतारकांना घेऊन आपल्या जाहिरातींनी स्वतःचे एक वेगळेपण प्रस्थापित केले आहे. 

सोबतची जाहिरात आहे आपल्या देशातला नामांकित उद्योग समूह गोदरेजने १९२४ मध्ये केलेली!  तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा. स्वदेशीचा नारा दिला गेला होता. स्वदेशी वस्तूदेखील चांगल्या गुणवत्तेच्या असू शकतात हे लोकांच्या मनावर ठसवण्याची आवश्यकता होती. १९१९ च्या सुमारास गोदरेजने चावी ब्रँडचा आंघोळीचा स्वदेशी साबण बाजारात आणला. हा भारतामध्ये उत्पादित झालेला पहिला अहिंसक साबण होता. त्यापूर्वी साबणाच्या उत्पादनासाठी प्राणीज चरबी वापरली जाई. या साबणामध्ये वनस्पतीजन्य स्निग्धपदार्थ वापरलेले होते. या साबणाच्या जाहिरातीत झळकलेल्या व्यक्तीदेखील अत्यंत मोठ्या आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये अग्रभागी होत्या. त्यात होमरूल चळवळीच्या डॉ. ॲनी बेझंट, सी. राजगोपालाचारी अशी मोठी व्यक्तित्वे होती.

सोबतची जाहिरात गोदरेज यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना घेऊन केलेली! नोबेल पारितोषिक मिळवणारे गुरुदेव टागोर हे काव्य, संगीत, शिक्षण यासारख्या असंख्य क्षेत्रामध्ये एक वेगळे स्थान असणारे लोकोत्तर आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व.  गोदरेज यांच्या स्वदेशी उत्पादनांच्या प्रयत्नांना महात्माजींचे खूप प्रोत्साहन मिळाले होते. गांधीजी स्वतः साबण वापरीत नसत, त्यामुळे त्याची जाहिरात त्यांनी स्वतः केली नाही; पण त्यांच्या सूचनेवरूनच गुरुदेव रवींद्रनाथांनी या जाहिरातीमध्ये सहयोग द्यायला मान्यता दिली होती. ‘मला गोदरेजपेक्षा चांगला असणारा कोणताही परदेशी साबण माहीत नाही आणि मी गोदरेज साबण वापरण्याचा नेहमीच आग्रह धरेन,’ अशा शब्दांमध्ये रवींद्रनाथांनी  गोदरेज साबणाची शिफारस केलेली आहे. गोदरेज साबण हा सर्व दृष्टीने परिपूर्ण साबण आहे, अशी मेजर डिकिन्सन या त्यावेळच्या रासायनिक विश्लेषकांची प्रतिक्रियादेखील रवींद्रनाथांच्या प्रशस्तीबरोबरच आपल्याला या जाहिरातीत वाचायला मिळते.  त्याकाळी गोदरेजचा कारखाना मुंबईच्या लोअर परळ भागातल्या डिलाइल रोडच्या परिसरात होता, असा तपशीलही यात दिसतो. गोदरेजने ग्राहकांचा विश्वास मिळवला आणि तो शतकापेक्षाही अधिक काळ टिकवला आहे हे खूप महत्त्वाचे आहे. (pdilip_nsk@yahoo.com)

टॅग्स :रवींद्रनाथ टागोरजाहिरात