GST Reform: दिवाळीला किंवा त्यानंतर तुम्हाला जीएसटीमध्ये मोठे बदल दिसू शकतात. पंतप्रधान मोदींनी आधीच याची घोषणा केली आहे. त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषणादरम्यान येत्या काळात जीएसटीमध्ये मोठे बदल केले जाणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आवश्यक वस्तू स्वस्त होतील. आता प्रश्न असा आहे की पेट्रोल आणि डिझेल देखील जीएसटीच्या कक्षेत येतील का? जर ते येणार असतील तर ते कोणत्या स्लॅबमध्ये ठेवले जाईल?
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं की पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी थोडा वेळ लागेल. म्हणजेच जीएसटी २.० लागू झाल्यानंतरही तुमचे पेट्रोल-डिझेलचं बिल कमी होणार नाही.
तंबाखू आणि अल्कोहोलवर ४० टक्के जीएसटी?
अर्थ मंत्रालयानं नुकतंच मंत्र्यांच्या गटाला विशेष दरांसह दोन जीएसटी स्लॅबचा प्रस्ताव पाठवला आहे. वृत्तानुसार, सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल हे ४० टक्के जीएसटी स्लॅबमध्ये टाकले जाऊ शकतात. जर असं झालं तर या उत्पादनांसाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
पेट्रोल आणि डिझेलमधून मोठी कमाई
पेट्रोलियम उत्पादनं किंवा दारू, तंबाखू इत्यादी सरकारी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत आहेत. अशा परिस्थितीत, सरकार यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खूप चर्चा करेल. जीएसटी कौन्सिलची बैठक सप्टेंबरमध्ये होऊ शकते. आता हे पाहावं लागेल की मंत्र्यांचा गट कोणत्या प्रस्तावांवर सहमत आहे आणि कोणत्यावर नाही.
पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या बाहेर ठेवली गेली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर या दिवाळीत सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळू शकेल असं दिसतंय. टीव्ही, फ्रिज, कार, कपडे, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला जाऊ शकतो. विम्यावरील जीएसटीही कमी केला जाऊ शकतो.