नवीन जीएसटी (GST) दर लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीदरम्या चमक परतली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी टीव्ही आणि एयर-कंडिशनर्ससारख्या घरगुती उपकरणांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. जीएसटी कौन्सिनं कर दरांमध्ये केलेल्या मोठ्या सुधारणांनंतर आता ५% आणि १८% च्या दोन-स्लॅब कर रचना (टॅक्स स्ट्रक्चर) लागू झाली आहे, ज्यामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घरगुती उपकरणांच्या विक्रीत मोठी वाढ
पीटीआयच्या वृत्तानुसार, जीएसटी दरांमधील कपातीचा सर्वाधिक परिणाम घरगुती उपकरणांवर (होम अप्लायंसेस) दिसत आहे. रूम एयर-कंडिशनर्सवर यापूर्वी २८% कर लागत होता, जो आता १८% झाला आहे. हायर इंडियाचे अध्यक्ष एन.एस. सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्यांची विक्री सामान्य दिवसांच्या तुलनेत दुप्पट झाली. त्याचप्रमाणे, ब्लू स्टारचे एमडी बी. थियागराजन यांनी, ग्राहकांमध्ये दिसत असलेल्या उत्साहामुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये विक्री मागील वर्षाच्या तुलनेत २०% पर्यंत वाढू शकते, असा विश्वास व्यक्त केला.
टीव्ही उत्पादकांनाही या बदलाचा खूप फायदा झाला आहे. सुपर प्लास्ट्रॉनिक्स प्रा. लि. चे सीईओ अवनीत सिंग मारवाह यांनी, जीएसटी २.० च्या पहिल्याच दिवशी टीव्हीच्या विक्रीत ३० ते ३५% वाढ झाल्याचं म्हटलं. विशेषतः ४३ आणि ५५ इंच स्क्रीन असलेल्या टीव्ही सेट्सच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे, कारण त्यांच्यावरील जीएसटी कमी झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दैनंदिन वस्तूंच्या विक्रीतही वाढ
फक्त महागड्या इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे, तर दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या विक्रीतही वाढ नोंदवली गेली आहे. जरी नवीन एमआरपी (MRP) संदर्भात सुरुवातीच्या दिवसांत दुकानदार आणि ग्राहकांमध्ये काही संभ्रम दिसला, तरी एफएमसीजी कंपन्यांनीही नवीन दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणं सुरू केलंय. "वितरक स्तरावर चांगली विक्री झाली आहे आणि येणाऱ्या दिवसांत जेव्हा हा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचेल, तेव्हा यात आणखी वाढ होईल. जीएसटी आणि किंमत निश्चितीबाबतचा सुरुवातीचा संभ्रम लवकरच दूर होईल," असा विश्वास पारले प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी व्यक्त केला.
सणासुदीच्या हंगामात दुहेरी अंकात वाढीची अपेक्षा
जीएसटी दरांमधील कपातीची वाट पाहत ग्राहक आतापर्यंत खरेदी टाळत होते, ज्यामुळे घरगुती उपकरणांची विक्री जवळपास थांबली होती. पण आता नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत चालणाऱ्या या दीर्घ सणासुदीच्या हंगामात कंपन्या आणि डीलर्सना दुहेरी अंकात विक्री वाढीची अपेक्षा आहे. सहसा, वर्षातील एकूण विक्रीपैकी सुमारे एक-तृतीयांश हिस्सा याच सणासुदीच्या हंगामात येतो. अशा परिस्थितीत, जीएसटीचे नवीन दर कंपन्यांसाठी एक मोठे बूस्टर सिद्ध होऊ शकतात.