PM Narendra Modi On GST: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी (२२ सप्टेंबर) वस्तू आणि सेवा करात (GST) मोठी कपात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. भविष्यात करात आणखी कपात होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 'अर्थव्यवस्था मजबूत झाल्यावर कर कमी होत जातील,' असं ते म्हणाले. २०१४ मध्ये १ लाख रुपयांच्या खरेदीवर सुमारे २५ हजार रुपये कर लागत होता, जो आता ५-६ हजार रुपयांवर आल्याचे ते म्हणाले.
गुरुवारी यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमधील कपात आणि त्यामुळे होणाऱ्या बचतीचा सविस्तर उल्लेख केला. "आज देश जीएसटी बचत उत्सव साजरा करत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही इथेच थांबणार नाही. २०१७ मध्ये आम्ही जीएसटी आणला, आर्थिक बळकटीचं काम केलं. २०२५ मध्ये पुन्हा आणला, पुन्हा आर्थिक बळकटी आणू आणि जशी-जशी आर्थिक बळकटी येईल, तसा-तसा कराचा भार कमी होत जाईल. देशवासीयांच्या आशीर्वादानं जीएसटी सुधारणांची प्रक्रिया सतत सुरू राहील," असं ते भविष्यातही यात कपात करण्याचे संकेत देत म्हणाले.
२०१४ पूर्वी अनेक प्रकारचे कर होते, ज्यामुळे व्यवसाय आणि कुटुंबाचे बजेट कधीही संतुलित होऊ शकत नव्हते, असे मोदी म्हणाले. एक हजार रुपयांच्या शर्टवर ११७ रुपये कर लागत होता. २०१७ मध्ये आम्ही जीएसटी आणल्यावर तो १७० रुपयांवरून ५० रुपयांवर आला आणि आता २२ सप्टेंबरनंतर त्याच शर्टवर फक्त ३५ रुपये कर भरावा लागेल. २०१४ मध्ये टूथपेस्ट, तेल, शॅम्पू इत्यादींवर कोणी १०० रुपये खर्च केले तर ३१ रुपये कर लागत होता. २०१७ मध्ये तो १८ रुपयांवर आला. आता तीच वस्तू १०५ रुपयांना मिळेल. १३१ रुपयांची वस्तू १०५ रुपयांवर आली असल्याचे मोदी म्हणाले.
बहुतांश वस्तूवर ५ टक्के जीएसटी
२०१४ पूर्वी जर एखादं कुटुंब वर्षाला एक लाख रुपयांचे सामान खरेदी करत असेल, तर त्यांना त्यावेळी सुमारे २५ हजार रुपये कर भरावा लागत होता. पण आता नेक्स्ट जनरेशन जीएसटीनंतर त्यांना फक्त ५-६ हजार रुपये कर भरावा लागेल, कारण गरजेच्या बहुतांश वस्तूंवर आता फक्त ५ टक्के जीएसटी आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
ट्रॅक्टरपासून स्कूटरपर्यंत सर्व काही स्वस्त
२०१४ पूर्वी एक ट्रॅक्टर खरेदी करताना ७० हजार रुपयांपेक्षा जास्त कर द्यावा लागत होता. आता त्याच ट्रॅक्टरवर फक्त ३० हजार कर लागतो. शेतकऱ्याची एका ट्रॅक्टरवर ४० हजार रुपयांची बचत होत आहे. थ्री-व्हीलरवर तेव्हा ५५ हजार रुपये कर लागत होता, आता त्याच थ्री-व्हीलरवर जीएसटी सुमारे ३५ हजार रुपये झाला आहे, म्हणजेच थेट २० हजार रुपयांची बचत. जीएसटी कमी झाल्यामुळे स्कूटर २०१४ च्या तुलनेत ८ हजार आणि मोटरसायकल ९ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय अशा सर्वांची बचत झाली आहे.
काँग्रेसवर जोरदार हल्ला
कर सवलतीचा सविस्तर उल्लेख करताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. "काही राजकीय पक्ष देशातील लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१४ पूर्वी जे सरकार चालवत होते, त्यांच्या अपयशांना लपवण्यासाठी काँग्रेस आणि त्याचे मित्र पक्ष जनतेशी खोटे बोलत आहेत. सत्य हे आहे की, काँग्रेस सरकारच्या काळात करांची लूट होती आणि त्या लुटलेल्या संपत्तीतूनही लूट होत होती. सामान्य नागरिकाला कराच्या ओझ्याखाली दाबले जात होते. आमच्या सरकारनं कर आणि महागाई कमी केली आहे. देशवासीयांचे उत्पन्न आणि बचत वाढवली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात २ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर माफ होता, आज १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. आयकर आणि जीएसटीमधील सवलतीमुळे लोकांचे अडीच लाख कोटी रुपये वाचले आहेत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Web Summary : PM Modi signaled future GST cuts as the economy strengthens. He highlighted reduced tax burdens on various goods, benefiting citizens and saving them money. Modi criticized previous Congress tax policies, emphasizing his government's efforts to lower taxes and increase savings for the common man.
Web Summary : पीएम मोदी ने अर्थव्यवस्था मजबूत होने पर जीएसटी में और कटौती का संकेत दिया। उन्होंने विभिन्न वस्तुओं पर कर के बोझ को कम करने पर प्रकाश डाला, जिससे नागरिकों को लाभ हुआ और उनकी बचत हुई। मोदी ने पिछली कांग्रेस कर नीतियों की आलोचना की, और अपनी सरकार के प्रयासों पर जोर दिया।