जीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यानुसार ९० टक्के वस्तू या ५ आणि १८ टक्के जीएसटीमध्ये आणण्यात आल्या आहेत. तसेच काही वस्तू या शून्य टक्के जीएसटीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या जीएसटीच्या नव्या रचनेत शेतकऱ्यांनाही मोठा फायदा करून देण्यात आला आहे.
शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित वस्तूंच्या जीएसटी दरात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार कृषी उपकरणे व यंत्रणेवर जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. ट्रॅक्टर, शेती, बागायती किंवा वनीकरण यंत्रे, जमिनीची तयारी/शेती यंत्रे, कापणी यंत्रे, कंबाइन हार्वेस्टर, भूईमुगाळ, पिक कापणी मशीन, घास मावर, कंपोस्टिंग मशीन इत्यादी यांच्यावर जीएसटी दर १२% वरून ५% करण्यात आले आहे. एवढेच नाही तर शेतकरी वापरत असलेले ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्ट्स, टायर, ट्यूब, व्हील रिम, ब्रेक, गियर बॉक्स, क्लच असेंबली, रेडिएटर, सायलेंसर, फेंडर, हूड, कूलिंग सिस्टिम, इत्यादींवर १८% वरून ५% दर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी स्वयंचलित-लोडिंग/ ट्रेलर्स व हाताने चालणाऱ्या वाहने (हातगाडी, रिक्षा, प्राणी-ओढणारी गाडी) यांना १२% वरून ५% दर लागू केला आहे. खते, कीटकनाशकांचे दर उतरणार...
सल्फ्युरीक ऍसिड, नाइट्रिक ऍसिड, अमोनिया, गिबरेल्लिक ऍसिड, सूक्ष्म पोषक (Micronutrients - Fertilizer Control Order अंतर्गत), जैविक कीटकनाशक (जसे Bacillus thuringiensis, Trichoderma, Neem आधारित, इ.) इत्यादींचा जीएसटी ५% केला आहे. हाताने चालणाऱ्या पंप, स्प्रिंकलर, ड्रिप सिंचन प्रणाली देखील ५ टक्के जीएसटीखाली आणण्यात आली आहे.
शेतीवरील अन्य सवलतीकंपोस्टिंग मशीन, बायोगॅस प्लांट, सौर उर्जा उपकरणे, व अशी अन्य शेतीसाठी वापरली जाणारी उपकरणे यांवरही जीएसटी दर १२% वरून ५% करण्यात आले आहेत.