जीएसटी दरांमध्ये बदल केले जाणार आहेत. यामुळे अनेक वस्तूंवरील कर कमी झाल्याने त्यांच्या किंमती १०-१२ टक्क्यांनी कमी होणार आहेत. याची अनेकजण वाट पाहत आहेत. अशातच या कोणकोणत्या वस्तू असतील असा सवाल अनेकांच्या मनात आहे. यावर आता एक मोठी अपडेट येत आहे.
३ आणि ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. यामध्ये जवळपास १७५ वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामध्ये एसी, टीव्ही आणि सिमेंट आदी वस्तूंचाही समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर २८% वरून १८% पर्यंत कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर मोटरसायकल, स्कूटरवरील जीएसटी देखील कमी होणार आहे. सरकारने सुमारे १७५ उत्पादनांवरील जीएसटीमध्ये १०% पेक्षा जास्त कपात करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
लहान हायब्रिड कार आणि बहुतेक मोटारसायकलींवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्याचे प्रस्तावित आहे. या वस्तू स्वस्त होणार असल्या तरी कार्बोनेटेड पेयांवरील कर ४० टक्के ठेवण्याचा प्रस्ताव आहे. तंबाखू, पान मसाला, गुटखा आणि संभाव्य ऑनलाइन गेमिंग सारख्या लक्झरी आणि वाईट गोष्टींच्या कक्षेत येत असलेल्या वस्तू, सेवा या ४० टक्के नव्या स्लॅबमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
या कंपन्यांना प्रचंड फायदा...
छोट्या पेट्रोल हायब्रिड कारवरील जीएसटी कमी झाला तर टोयोटा आणि मारुतीलाच याचा फायदा होणार आहे. कारण या दोनच कंपन्यांकडे हायब्रिड कार आहेत. टॅल्कम पावडर, टूथपेस्ट आणि शॅम्पूसारख्या पर्सनल केअरच्या वस्तूंवर जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी होऊ शकतो. याचा फायदा हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांना होणार आहे.