Join us

Portal Against Misleading Advertisements : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात सरकार सुरू करणार स्वतंत्र पोर्टल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:56 IST

Portal Against Misleading Advertisements : ग्राहक व्यवहार मंत्रालचा पुुढाकार, तक्रार करणे होणार सोपे

नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिरांतींविरोधात तक्रार करण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालय एक स्वतंत्र पोर्टल सुरू करणार असून त्यामुळे अशा जाहिरातींविरोधात तक्रार करणे सोपे होणार आहे.

भ्रामक जाहिरातींच्या विरोधात तक्रार करण्यासाठी असे कोणतेच व्यासपीठ सध्या उपलब्ध नाही. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे ‘गामा पोर्टल’ मागील २ वर्षांपासून बंद पडलेले आहे. भ्रामक जाहिरातींच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर सरकारने विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ग्राहक व्यवहार मंत्रालय नवीन तक्रार पोर्टल घेऊन येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पतंजलीच्या भ्रामक जाहिरातींमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला. पतंजलीविरोधातील तक्रारी एका मंत्रालयातून दुसऱ्या मंत्रालयात फिरत राहिल्याने अनेक वर्षे कंपनीविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतरच त्यावर कारवाई झाली.

कठोर शिक्षेची तरतूद

वास्तविक चुकीची अथवा खोटी माहिती देणारी जाहिरात करणे हा ग्राहक कायद्यानुसार गुन्हा आहे. त्याविरोधात देशात कठोर कायदेही अस्तित्त्वात आहेत. शरीराला आकर्षक बनवणारे खोटे दावे केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड आणि ६ महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.

एखाद्या उत्पादनाने ग्राहकाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचल्यास ५ लाख रुपयांचा दंड व ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायद्यात केली जात आहे. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचा दंड आणि ७ वर्षांच्या कारवासाची तरतूदही केली जाते.

टॅग्स :जाहिरात