लखनौ - पुन्हा एकदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारसमोर वाढत्या बेरोजगारीमुळे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. सद्यस्थितीत बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याची आकडेवारी समोर आल्याने सरकारवर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे बेरोगजारी दूर करण्यासाठी सरकारने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी दोन कॅबिनेट कमिटींची स्थापना केली आहे. कौशल विकास मंत्रालयाच्या माध्यमातूनही बेरोजगारी दूर करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सिंगापूरचे अनुकरण करत इंस्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग फॉर स्किल्स या संस्थेची मुंबईत स्थापना करण्यात येणार आहे. केंद्रीय कौशल विकास मंत्री महेंद्रनाथ पांडेय यांनी ही माहिती दिली आहे. पांडेय यांनी सांगितले की, ''सिंगापूरप्रमाणे मुंबईमध्ये इंस्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग फॉर स्किल्सची स्थापना होणार आहे. यासाठी 250 कोटी रुपये इतका खर्च होईल. ही संस्था रोजगारपुरक कार्यक्रम हाती घेऊन तरुणांना रोजगार देण्यासाठी मदत करेल.''
बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारचा सिंगापूर पॅटर्न, होणार 'या' संस्थेची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 09:24 IST