Join us

गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:46 IST

google chrome security : जर तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारत सरकारने गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे.

google chrome security : स्मार्टफोन असो किंवा कॉम्प्युटर, बहुतेकजण गुगल क्रोम ब्राउझर वापरतात. पण आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारने क्रोम वापरणाऱ्यांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. सरकारी सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने सांगितले आहे की क्रोममध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा गैरफायदा हॅकर्स घेऊ शकतात आणि तुमचा महत्त्वाचा डेटा चोरी करू शकतात, तसेच तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर हॅक करू शकतात.

CERT-In नुसार, क्रोमच्या जुन्या आवृत्त्यांमध्ये हे धोके आहेत. हॅकर्स या त्रुटींचा वापर करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सहज प्रवेश मिळवू शकतात. ते तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस टाकू शकतात, ज्यामुळे तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा तुमचा कॉम्प्युटर पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात जाऊ शकतो.

तुम्ही कोणती क्रोम आवृत्ती वापरत आहात?जर तुम्ही विंडोज (Windows) वापरकर्ते असाल, तर तुमच्या क्रोमची आवृत्ती १३६.०.७१०३.११४ च्या आधीची नसावी.आणि जर तुम्ही मॅक (Mac) किंवा लिनक्स (Linux) वापरकर्ते असाल, तर तुमच्या क्रोमची आवृत्ती १३६.०.७१०३.११३ च्या आधीची नसावी.

या धोक्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा?

  • तुमचा गुगल क्रोम त्वरित अपडेट करा : तुमच्या क्रोम ब्राउझरला लगेच नवीनतम आवृत्तीमध्ये अपडेट करा. गुगल वेळोवेळी सुरक्षा सुधारणा घेऊन येत असते, ज्यामुळे हे धोके कमी होतात. क्रोम अपडेट करण्यासाठी, ब्राउझरच्या उजव्या बाजूला तीन उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा, 'मदत' (Help) वर जा आणि 'गुगल क्रोम बद्दल' (About Google Chrome) निवडा. क्रोम आपोआप अपडेट तपासण्यास सुरुवात करेल आणि नवीन आवृत्ती उपलब्ध असल्यास ती स्थापित करेल.
  • अज्ञात लिंकवर क्लिक करू नका : कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करणे टाळा. हॅकर्स अशा लिंक्सद्वारे तुमच्या सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतात.
  • सुरक्षित वेबसाइट्स वापरा : नेहमी HTTPS असलेल्या सुरक्षित वेबसाइट्स वापरा. यामुळे तुमच्या आणि वेबसाइटमधील माहिती एन्क्रिप्टेड राहते.
  • अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा : तुमच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये चांगल्या प्रतीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर स्थापित करा आणि ते नियमितपणे अपडेट ठेवा. हे सॉफ्टवेअर धोकादायक फाइल्स आणि वेबसाइट्सपासून तुमचे संरक्षण करू शकते.
  • फायरवॉल सक्रिय ठेवा : तुमच्या कॉम्प्युटरमधील फायरवॉल नेहमी चालू ठेवा. फायरवॉल तुमच्या सिस्टीममध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यास मदत करते.
  • नियमितपणे स्कॅन करा : तुमच्या सिस्टीमला अँटीव्हायरस सॉफ्टवेअरने नियमितपणे स्कॅन करा, जेणेकरून कोणतीही धोकादायक फाईल तुमच्या सिस्टीममध्ये असल्यास ती शोधता येईल.

वाचा - ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

भारत सरकारने जारी केलेला हा सुरक्षा इशारा गांभीर्याने घ्या आणि त्वरित आपल्या क्रोम ब्राउझरला अपडेट करून स्वतःला सुरक्षित ठेवा. थोडीशी निष्काळजीपणा तुमच्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकते.

 

टॅग्स :सायबर क्राइमगुगलतंत्रज्ञान