Join us

आनंद वार्ता : यंदा बेरोजगारांना मिळणार, नोकरीच्या भरभरून संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 06:36 IST

Good News :लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच वेतन कपात सहन करावी लागली. मात्र आता हा वाईट काळ संपणार असून नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, असे ‘मर्कर मेटल’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे.

नवी दिल्ली : यंदा ६० टक्के कंपन्या नोकर भरतीची प्रक्रिया राबविणार असल्यामुळे बेरोजगारांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतील, असे एका अहवालात म्हटले आहे. कोविड-१९ साथीमुळे मागील सव्वा वर्षांत अनेकदा लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लादले गेले आहेत. त्याचा जबर फटका उद्योग जगताला बसला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच वेतन कपात सहन करावी लागली. मात्र आता हा वाईट काळ संपणार असून नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, असे ‘मर्कर मेटल’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे.

मर्कर मेटलने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदा ६० टक्के कंपन्या भरती प्रक्रिया राबवणार आहेत. अनेक कंपन्यांनी एप्रिल-मे पासूनच भरती प्रक्रिया सुरूही केली असून आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून मुलाखती घेतल्या जात आहेत. येत्या जुलैपासून भरती प्रक्रिया अधिक वेगाने राबवण्यात येईल, असे चित्र आहे. अहवालात म्हटले आहे की, कोविड-१९ साथीची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी आशा कंपन्यांना वाटते. 

त्यामुळेच कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करीत आहेत. जवळपास ६० टक्के कंपन्या नव्या पदांवर कुशल कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे क्षमता आणि योग्यता असलेल्या व्यक्तींना येत्या काही महिन्यांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. एखाद्या क्षेत्रात विशेष प्राविण्य असलेल्या अथवा एखाद्या विशिष्ट कामात नैपुण्य मिळवलेल्या व्यक्तींना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यक्तींना सहजपणे नोकऱ्या मिळतील.

‘व्हर्च्युअल हायरिंग’  - मर्कर मेटलने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, एप्रिल-मेमध्ये बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन होते; तरीही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती केली. आगामी काळात कंपन्या ‘व्हर्च्युअल हायरिंग’ला म्हणजे ‘ऑनलाईन भरती’ला प्राधान्य देतील. 

- ८१% कंपन्या लॉकडाऊन काळात भरतीसाठी ‘व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म’चा वापर करत आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी भरतीचा वेग स्थिर असेल.

टॅग्स :कर्मचारीनोकरी