Join us

Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:31 IST

Infosys Employee Bonus : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसनं (Infosys) सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनस जाहीर केला आहे.

Infosys Employee Bonus : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसनं (Infosys) सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनस जाहीर केला आहे. इन्फोसिसकडून कर्मचाऱ्यांना (Infosys Employees) नोव्हेंबरच्या पगारासह ८५ टक्के परफॉर्मन्स बोनस दिला जाऊ शकतो. परफॉर्मन्स बोनससाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच ईमेल पाठविण्यात आला आहे. यानंतर कंपनीच्या डिलिव्हरी आणि सेल्स वर्टिकलमध्ये ज्युनिअर आणि मिड लेव्हल कर्मचाऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळणार बोनस

बोनस बँड ६ आणि त्याच्या खालील कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जाईल. यामध्ये ज्युनिअर ते मिड लेव्हर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यांना बोनस दिला जातो. वैयक्तिक कामगिरीच्या आधारे बोनसचं वितरण वेगवेगळं असेल. याबाबत कंपनीकडून प्रतिक्रिया मागविणाऱ्या ई-मेलला प्रकाशनाच्या वेळी प्रतिसाद मिळाला नाही.

काय म्हटलंय ईमेलमध्ये?

"आमची क्षमता वाढविण्यात आणि आमच्या ग्राहकांना असाधारण मूल्य प्रदान करण्यात आपली वचनबद्धता महत्त्वपूर्ण ठरली आहे. कंपनीसाठी आपल्या योगदानाबद्दल आभार मानत आहे आणि आम्ही भविष्यात दीर्घकाळ आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत," असं कंपनीनं पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलंय. रिपोर्टनुसार, गेल्या दोन तिमाहीनंतर बोनसमध्ये वाढ झाली आहे, गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या शेवटी ६०% परफॉर्मन्स बोनस आणि पहिल्या तिमाहीच्या शेवटी ८०% परफॉर्मन्स बोनस देण्यात आला होता.

इन्फोसिसने दिलेली बोनसची रक्कम त्यांची स्पर्धक कंपनी टीसीएसपेक्षा जास्त आहे. टाटा समूहातील कंपनी टीसीएसनं सरासरी ५० ते ६० टक्के बोनस दिला आहे, तोही ऑफिस अटेंडन्सशी लिंक करण्यात आला होता. इन्फोसिसचा बोनस हा ऑफिस अटेंडन्सशी जोडलेला नाही. कंपनीच्या हायब्रीड मॉडेलनुसार कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान १० दिवस कार्यालयात येणे आवश्यक आहे.

वेतनवाढही होणार

गेल्या काही वर्षांत काही अडचणी असल्या तरी एप्रिल २०२५ पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येईल, असंही कंपनीनं जाहीर केलंय. इन्फोसिसनं दुसऱ्या तिमाहीअखेर दमदार कामगिरी करत निव्वळ नफ्यात ४.७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचा नफा वाढून ६,५०६ कोटी रुपये झाला आहे. महसूलही ५.१ टक्क्यांनी वाढून ४०,९८६ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ही वाढीचा अंदाज ३.७५ टक्क्यांवरून ४.५ टक्के करण्यात आला आहे.

टॅग्स :इन्फोसिसव्यवसायपैसा