Join us

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:35 IST

सध्या ईपीएफओचा एकूण निधी २८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याचे सुमारे ७८ मिलियन सदस्य आहेत. सदस्यांच्या सोयीसाठी ईपीएफओ एटीएममधून पैसे काढण्याच्या सेवेवर काम करत आहे.

EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना जानेवारी २०२६ पर्यंत त्यांच्या जमा निधीचा काही भाग एटीएमद्वारे काढण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे. एका रिपोर्टनुसार, ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या सुविधेला मंजुरी देऊ शकते.

अधिक माहिती काय?

मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, सीबीटीच्या एका सदस्यानं सांगितलं की, ईपीएफओची आयटी (IT) पायाभूत सुविधा आता अशा व्यवहारांसाठी तयार आहे, मात्र एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अद्याप निश्चित करणं बाकी आहे. सध्या ईपीएफओचा एकूण निधी २८ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्याचे सुमारे ७८ मिलियन सदस्य आहेत. २०१४ मध्ये ही आकडेवारी अनुक्रमे ७.४ लाख कोटी रुपये आणि ३३ मिलियन सदस्य इतकी होती. श्रम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सदस्यांना त्यांच्या जमा निधीपर्यंत अधिक सहज पोहोच मिळावी यासाठी ही सुविधा आवश्यक आहे. मंत्रालयानं ही सुविधा लागू करण्यासाठी बँका आणि आरबीआयसोबत चर्चाही केली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

ईपीएफओ स्पेशल कार्ड जारी करू शकते

सूत्रांनुसार, ईपीएफओ आपल्या सदस्यांना एक विशेष कार्ड जारी करू शकते, ज्याद्वारे ते एटीएममधून आपल्या निधीचा काही भाग काढू शकतील. तज्ज्ञांचे मत आहे की, या सुविधेमुळे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत सदस्यांना निधी मिळवणं सोपं होईल, कारण सध्या पैसे काढण्याच्या प्रक्रियेत अनेकदा विलंब होतो आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. दरम्यान, तज्ज्ञांनी हेदेखील सांगितलं की, ही सुविधा यशस्वीरित्या लागू करण्यासाठी ईपीएफओला आपली डिजिटल पायाभूत सुविधा आणि बँकिंग प्रणालीसोबतचा समन्वय अधिक मजबूत करावा लागेल.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीबँक