Join us

गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 07:50 IST

तेजीचे संकेत, कंपन्यांकडून निधी उभारणी

मुंबई : इस्रायल-इराण युद्धाचे ढग विरल्याने आता शेअर बाजारामध्ये पुन्हा नवचैतन्य पसरू लागले आहे. भारतीय भांडवली बाजारात येत्या आठवड्यात एकूण सात आयपीओ आणि एकाच वेळी १९ कंपन्यांची लिस्टिंग होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही गुंतवणुकीची आणि पैसा कमावण्याची संधी ठरू शकते.

आयपीओच्या या लाटेत दोन मोठ्या कंपन्या क्रिझॅक लिमिटेड आणि ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस यांचे शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. पाच लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्याही आपले आयपीओ घेऊन येत आहेत. हे सर्व इश्यू ३० जूनपासून ७ जुलैदरम्यान खुले राहतील. या आयपीओ लाटेमुळे आर्थिक वर्ष २०२५–२६च्या पहिल्या सहामाहीत प्राथमिक बाजारातील निधी उभारणीचा आकडा सर्व अपेक्षा ओलांडू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्याच्या बाजारातील स्थिती, मजबूत गुंतवणूकदार सहभाग व आयपीओसाठीची पूरक परिस्थिती पाहता, या आयपीओंना गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो.

येत्या आठवड्यातील आयपीओ

कंपनीचे सबस्क्रिप्शनची   इश्यूचा अंदाजे

नाव    तारीख आकार (₹ कोटींमध्ये)

क्रिझॅक २ जुलै – ४ जुलै ८६०.००

ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस     ३ जुलै – ७ जुलै  —

सिल्की ओव्हरसीज      ३० जून – २ जुलै        ३०.६८

पुष्पा ज्वेलर्स    ३० जून – २ जुलै        ९८.६५

सेडार टेक्सटाइल        ३० जून – २ जुलै        ६०.९०

मार्क लोइर      ३० जून – २ जुलै        २१.००

वंदन फूड्स     ३० जून – २ जुलै        ३०.३६

काही इश्यूंची किंमत आकर्षक पातळीवर निश्चित करण्यात आली आहे, जी अल्पकालीन लाभाशिवाय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीही योग्य वाटेल.

१९ कंपन्या                करणार पदार्पण

पुढील आठवड्यात १९ कंपन्यांचे शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणार आहेत. यामुळे बाजारात मोठी हालचाल अपेक्षित आहे. या लिस्टिंग्समध्ये एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेस, कल्पतरू आणि एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस यांसारख्या मोठ्या आणि चर्चेत असलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रमाणात मोठा स्केल आणि गुंतवणूकदारांमध्ये असलेली उत्सुकता लक्षात घेता, या कंपन्यांकडे बाजाराचे विशेष लक्ष राहणार आहे.

नुकतेच आयपीओ पूर्ण झालेल्या अनेक एसएमई कंपन्याही लिस्ट होणार आहेत. यात नीतू योशी लिमिटेड, ॲडकाउंटी मीडिया, इंडोगल्फ क्रॉपसायन्सेस, व्हॅलेन्सिया इंडिया, प्रो एफएक्स टेक, ऐस अल्फा टेक आणि मूव्हिंग मीडिया एंटरटेनमेंट अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार