Join us
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! कर्मचाऱ्यांना सॅलरीऐवजी देणार सोनं; कारण ऐकलं तर कराल कंपनीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 09:51 IST

टॅलीमनी नावाच्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना सॅलरीऐवजी सोनं ऑफर करत आहे.

कोरोनानंतरच्या काळात अनेक छोट्या मोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत आहेत. चांगला पगार, चांगले वातावरण आणि कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ हे कंपनीसाठी प्राधान्य झाले आहे. अनेकदा सॅलरीसोबत फूड कुपन त्याशिवाय अन्य फायदे असलेल्या गोष्टी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. परंतु इंग्लंडमधील एका कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी जे काही केले ते ऐकून तुम्हालाही नवल वाटेल.

टॅलीमनी नावाच्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना सॅलरीऐवजी सोनं ऑफर करत आहे. लंडनच्या CityAM.com रिपोर्टनुसार, टॅलीमनी नावाच्या कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या वर्तमान आणि भविष्याला ध्यानात ठेवून त्यांना सॅलरीऐवजी सोनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ही नवीन पॉलीसी प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. कंपनीनं वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या २० लोकांना आता या पॉलिसीचा लाभ दिला आहे. परंतु या सिस्टममुळे कंपनीला फायदा झाला तर कंपनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही ऑफर सुरू करण्याचा विचार करत आहे.

कंपनीचे सीईओ कॅमरन पैरी यांनी सांगितले की, कोरोनामुळे आर्थिक स्थिती खूप खराब झाली आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना पाऊंडमध्ये सॅलरी देण्यात अर्थ नाही. प्रत्येक दिवशी त्याचा व्हॅल्यू कमी होत आहे. सातत्याने मार्केटमध्ये पाऊंड घसरत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सोने देऊन आम्हाला त्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सोने देण्याची ऑफर देत आहोत. इतकेच नाही जर कुणाला रोकड सॅलरी घ्यायची असेल तर त्याचाही पर्याय उपलब्ध आहे असंही त्यांनी सांगितले.

कंपनीच्या पॉलिसीचं अनेकांनी केले कौतुक

कंपनी कर्मचाऱ्यांना सॅलरीऐवजी सोने देत असल्याची बातमी समोर येताच अनेकांनी कंपनीच्या पॉलिसीचं कौतुक केले आहे. सोशल मीडियातही कंपनीच्या पॉलिसीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचसोबत आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कंपनीने चांगले पाऊल उचलल्याची कौतुक आर्थिक तज्ज्ञ करत आहेत.  

टॅग्स :सोनं