Join us

तिकडे युद्धाचा इकडे सोने-चांदीचा भडका; एका दिवसात घेतली माेठी उसळी, आणखी भाववाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 07:53 IST

शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. नागपुरातही साेन्याच्या दरांनी एक हजार रुपयांची उसळी घेतली. 

जळगाव/नागपूर : गेली काही दिवसांपासून घसरत गेलेले सोने-चांदीचे भाव आता इस्त्रायल व हमास यांच्यातील तणावानंतर पुन्हा वाढू लागले आहे. त्यामुळे शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. नागपुरातही साेन्याच्या दरांनी एक हजार रुपयांची उसळी घेतली. 

गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्ष सुरू झाला व सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले. आठवडाभरात सोने एक हजार ४०० रुपयांनी, तर चांदी चार हजार १०० रुपयांनी घसरली. सात महिन्यांतील नीचांकी भाव होते. त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानंतर मात्र, इस्रायल व हमास यांच्यातील तणावाचे रूपांतर हल्ल्यात झाले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाच्या भीतीने दर अचानक वाढले. अमेरिकेने या हल्ल्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात सोने-चांदीवर तर लगेच परिणाम होतो. हे युद्ध आणखी तीव्र झाल्यास सोने-चांदीसह अन्य घटकांवरदेखील त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :सोनंचांदीबाजार