लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जागतिक पातळीवरील अस्थिरता, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे आलेली अनिश्चितता आणि रुपयातील घसरण यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळले आहेत. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी राजधानी दिल्लीतील बाजारात सोन्याने तब्बल १ लाख ६ हजार रुपये प्रति १० ग्रॅम ही ऐतिहासिक पातळी गाठली आहे.
९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर सोमवारी १,०५,६७० रुपये प्रति १० ग्रॅम होता. मंगळवारी तो ४०० रुपयांनी वाढून १,०६,०७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. मागील सात सत्रांत सोन्याने तब्बल ५,९०० रुपयांची उसळी घेतली आहे. चालू कॅलेंडर वर्षात सोन्याच्या दरात ३४.३५ टक्के वाढ झाली असून, डिसेंबर २०२४ अखेरीस सोन्याचा दर ७८,९५० रुपये होता.
चांदीच्या किमतीही अवाक्याबाहेर
मंगळवारी चांदीच्या किमती १०० रुपयांनी वाढून १,२६,१०० रुपये प्रति किलो (सर्व करांसह) या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. मागील तीन दिवसांत चांदीत तब्बल ७,१०० रुपयांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ अखेरीस चांदीचा दर ८९,७०० रुपये प्रति किलो होता; तेथून आतापर्यंत ४०.५८ टक्के वाढ झाली आहे.