Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०१२ नंतर पुन्हा सोने ३२ हजारांवर; सराफा बाजारात तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:01 IST

आॅनलाइन खरेदीतही २० ते २५ टक्क्यांनी वाढ

- चेतन ननावरे मुंबई : तब्बल सहा वर्षांनी धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ पाहता, गुंतवणूकदारांची पसंतीही सोन्याला असल्याचे मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जैन म्हणाले की, दसऱ्यापासून सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत असून, त्यासाठी सोने खरेदी व बुकिंग सुरू झाली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल. या आधी गेल्या पाच वर्षांत धनत्रयोदशीला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ३० हजार रुपयांखाली होता. मात्र, सहा वर्षांनंतर सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. २०१२ साली धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दर ३१ हजार ६४० इतका होता. मात्र, यंदा शुक्रवारी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ३२ हजार १६० रुपये इतके होते.आॅनलाइन सोने खरेदीतही २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. मात्र, पारंपरिक दागिने खरेदीसाठी आजही ग्राहकांची पसंती सराफा पेढ्यांनाच असल्याचे चित्र आहे. लग्नसमारंभात वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांना नवा साज देण्याचा ट्रेंड आल्याचे झवेरी बाजारातील सराफांनी सांगितले. या ट्रेंडमध्ये सोन्याच्या दागिन्यांत खडे, हिरे बसवण्याची मागणी होत आहे. एकंदरच यंदा सोन्याचे दर वधारूनही सराफा बाजारासाठी दिवाळी ‘अच्छे दिन’ घेऊन आल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :सोनं