Join us  

सहा महिन्यांमध्ये सोनं ९,४६७ रूपये प्रति तोळा स्वस्त; दरात आणखी घसरण होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 5:19 PM

गुंतवणूकदारांनी वळवला शेअर बाजाराकडे मोर्चा

ठळक मुद्देचांदीचे दर सध्या चढेचगुंतवणूकदारांचा मोर्चा सोन्याकडून पुन्हा शेअर बाजाराकडे

गेल्या काही काळात सोन्याच्या दरात घसरण होताना आपल्याला दिसली. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मध्ये मध्ये काही किरकोळ वाढ सोडली तर ऑगस्ट २०२० पासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होतानाच दिसत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचे दर ५६ हजार २०० रूपये प्रति १० ग्राम इतके होती. तर ५ फेब्रुवारी रोजी हे दर घसरून ४६ हजार ७३८ रूपये प्रति १० ग्राम (दिल्लीतील सर्राफा बाजारातच्या किंमतीनुसार) इतके झाले. कोरोना महासाथीची भीती आता लोकांच्या मनातून दूर होऊ लागली आहे. यासाठी आता सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकं सोन्याची खरेदी करत नाहीत. गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे आपला मार्चा वळवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या किंमती अजून घसरकील. देशांतर्गत सर्राफा बाजारात सोन्याचे दर घसरून ४२ हजार रुपये प्रति १० ग्रामवर येऊ शकतात, असं मत काही जाणकारांनी व्यक्त केलं. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क कमी केल्यामुळे सर्राफा बाजारात सोनं १ हजार रूपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. १० ग्राम सोन्याचा दर आता ४७ हजार रूपयांच्या खाली आला आहे. पुढील १५ दिवसांमध्ये सोन्याचा दर अजून घसण्याची शक्यता असून दिवाळीपर्यंत पुन्हा तो ५० हजारांवर जाईल,  असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क कमी करून ७.५ टक्के करण्याचा प्रस्ताव सादर केल होता. सध्या तो १२.५ टक्के आहे. जुलै २०१९ मध्ये तो १० टक्क्यांपेक्षा अधिक इतका झाला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात झपाट्यानं वाढ होत गेली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर महाग होत आहे. यामुळेही सोन्याच्या दरात घसरण दिसू येत आहे. परदेशी बाजारांमध्ये सोन्याचे दर १,८०० डॉलर्स प्रति औंसच्या खाली आले आहेत. नोव्हेंबर २०२० नंतर पुन्हा अशी स्थिती आली आहे. चांदीचे दर सध्या चढेच आहेत. चांदीची मागणी वाढत असल्यामुळे त्याचे दर चढेच असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :व्यवसायसोनंचांदीअमेरिकाशेअर बाजारगुंतवणूक