Join us

गुढीपाडव्याला सोन्याची झळाळी वाढणार; 10 वर्षांतला विक्रम मोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 18:42 IST

उद्या खरेदीत 10 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज

- चेतन ननावरेमुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची झळाळी वाढणार आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा प्रति तोळ्यामागचा दर 33 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. आज सराफा बाजारात प्रति तोळा सोन्यासाठी वस्तू व सेवा करासह ३३ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या १० वर्षांत प्रथमच सोन्यानं हा उच्चांक गाठल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव कुमार जैन यांनी दिली.कुमार जैन यांनी सांगितले की, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला ग्राहक सोने खरेदीसाठी झवेरी बाजारासह अन्य बाजारपेठांत मोठी गर्दी करतात. गतवर्षी १८ मार्चला गुढीपाडवा होता. त्यावेळी प्रति तोळा सोन्याचा दर ३० हजार २२४ रुपये होता. मात्र गेल्या वर्षभरात सातत्याने सोन्याच्या दरात वाढ झाली. आज सोन्याचा प्रति तोळा दर ३२ हजार ५०० रुपये इतका आहे. त्यावर सुमारे १ हजार रुपये वस्तू व सेवा कर आकारल्याने प्रति तोळा सोन्यासाठी ग्राहकांना ३३ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाली असली, तरी खरेदीतील उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.मुहूर्तामुळे काही प्रमाणात का होईना ग्राहक खरेदीसाठी राज्यातील बाजारपेठांमध्ये जमत असल्याचे संघटनेने सांगितले. याशिवाय लग्नसराईचा काळ सुरू झाल्याने सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. मुंबईत तितका प्रतिसाद नसला, तरी इतर ठिकाणी ग्राहकांकडून सोन्याला मोठी मागणी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. परिणामी, राज्यात गुढीपाडव्याला सराफा बाजारांतील उलाढालीत १० टक्क्यांची वृद्धी दिसेल, अशी अपेक्षा सराफा बाजारातून व्यक्त होत आहे.

गेल्या पाच वर्षांत गुढीपाडव्याला असलेले सोन्याचे दर (प्रति तोळा)वर्ष                      सोन्याचे दर (रु.)१८ मार्च, २०१८    ३०,२२४२९ मार्च, २०१७    २८,६५१८ एप्रिल, २०१६    २८,९७४२१ मार्च, २०१५    २६,१७०३१ मार्च, २०१४    २८,५११ 

टॅग्स :सोनंगुढी पाडवा