Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Rate Today : सोन्याच्या भावात पुन्हा एकदा मोठी कपात, चांदीही झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 16:02 IST

पितृपक्षात भाव वाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात मात्र अधिक मासात घसरण होत असल्याचे उलट चित्र निर्माण झाले आहे.

सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे मंगळवारपाठोपाठ बुधवारीही एकाच दिवसात सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. यात ६२ हजार रुपये वरून ६१ हजार रुपये प्रति किलोवर तर सोने ५१ हजार ३०० रुपयांवरून ५० हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. पितृपक्षात भाव वाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात मात्र अधिक मासात घसरण होत असल्याचे उलट चित्र निर्माण झाले आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात अजूनही ही अस्थिरता कायम आहे. त्यामुळेच एरव्ही पितृपक्षात कमी होणारे सोने-चांदीचे भाव यंदा मात्र वाढले. परिणामी आठवडाभरात चांदीचे भाव वाढून ते ६८ हजार रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. मात्र आता अधिक मासात या दोन्ही धातूंचे भाव कमी-कमी होत आहे. 

दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यापासून सोने-चांदीच्या मागणीत घट होऊन त्यांचे भावही घसरतात. त्यात पितृपक्षात तर हे भाव आणखी कमी होतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे पितृपक्षातही सोने-चांदीचे भाव वाढत आहे. दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सातत्याने भाव अचानक कमी-जास्त होऊन बाजारात अस्थिरता निर्माण होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

२४ ऑगस्टला चांदी ६६ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६४ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. मात्र सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी भाव वाढ होऊन ती ६८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा घसरण होत जाऊन ती ७ सप्टेंबर रोजी ६६ हजार रुपयांवर आली. पुन्हा ९ सप्टेंबरला आणखी एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६५ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. मात्र त्यानंतर आठवडाभरात चांदी दीड हजार रुपये रुपयांनी वाढून ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. ही वाढ कायम राहात चांदी ६८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. सोन्याच्या भावात असाच चढ-उतार सुरू राहून ९ सप्टेंबर रोजी ५१ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते.मात्र अधिक मासात सोने-चांदीच्या भावात घसरण सुरू होऊन सलग दोन दिवसांपासून तर भाव अधिकच गडगडले आहे. मंगळवार २२ सप्टेंबरला चांदीच्या भावात थेट ६ हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६८ हजार रुपयांवरून ६२ हजार रुपये प्रति किलोवर तसेच सोनेही ६०० रुपयांनी घसरून ५१ हजार ९०० रुपये वरून ५१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर बुधवार २३ सप्टेंबर रोजी सोने-चांदीत पुन्हा प्रत्येकी एक हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ६१ हजार रुपये प्रति किलो तर सोने ५० हजार ३०० रुपये प्रति किलो वर आले आहे.

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंज